नाशिक – शहरासह जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू असल्याने धरणसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळेच दारणा आणि नांदूरमध्यमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तर, आणखी तीन दिवस जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
जून नंतर पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यात चिंतेचे वातावरण होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ठाण मांडलेल्या पावसाने जिल्ह्यातील जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. गंगापूर धरण ६० टक्के तर दारणा धरण ९२ टक्के भरले आहे. यामुळे नाशिककरांवर असलेल्या पाणी कपातीचे संकट दूर होण्याची चिन्हे आहेत. इगतपुरीत १४५ मिमी, त्र्यंबकेश्वरमध्ये ६६ आणि पेठमध्ये ७७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. नांदूरमध्यमेश्वरमधून गुरुवारी रात्री ९ वाजेपर्यंत १६ हजार ८६५ क्यूसेकने तर, दारणा धरणातून ९ हजार ९५६ क्युसेकने विसर्ग सुरु होता.
जिल्ह्यामध्ये गुरुवार ६२१.१ मिलिमीटर पावसाची सरासरी आहे. यंदा ६१७.२ मिलिमीटर बरसला आहे. म्हणजे, सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. गेल्या काही दिवसातील पावसामुळे खरीप पिकांना मोठा फायदा होणार आहे. पेठ, कळवण, सुरगाणा आणि नाशिक या तालुक्यांमधील पावसाने तेथील पिकांना अधिक लाभ होणार आहे.
हवामान विभागाचा अंदाज असा
बंगालच्या उपसागरापासून बिहारपर्यंत उत्तर-दक्षिण दिशेने कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. बंगालच्या उपसागरावर वायव्य आणि पश्चिम-मध्य भागात ओदिशा आणि उत्तर आंध्र प्रदेश किनारपट्टीजवळ वातावरणाच्या खालच्या स्तरात चक्रीवादळासारखी स्थिती निर्माण झाली आहे.
- वरील दोन प्रकारच्या प्रणालींमुळे बंगालचा उपसागर आणि लगतच्या भागात आज १३ ऑगस्ट रोजी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. या भागावर ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे आणि पुढील दोन- तीन दिवसात बंगालच्या उपसागरात उत्तरेला अधिक केंद्रीत होण्याची शक्यता आहे.
- मान्सूनचा पश्चिमी भाग त्याच्या सामान्य स्थितीपासून उत्तरेकडे सरकला आहे आणि पुढील ४८ तास तेथेच राहण्याची शक्यता आहे. त्याचा पूर्व भाग सामान्य स्थितीच्या जवळपासच आहे.
- वरील स्थितीच्या प्रभावामुळे:
- कोकण आणि गोव्यात पुढील ७२ तासात मुसळधार पावसाची शक्यता आहे. गुजरात राज्य, पूर्व राजस्थान आणि मध्य भारतातील बऱ्याच भागांमध्ये पुढील ४८ तासात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. गुजरात राज्य आणि पूर्व राजस्थानात तुरळक भागात अतिजास्त मुसळधार पावसाची देखील शक्यता आहे.
१५ ऑगस्ट (तिसरा दिवस): विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता आहे.
कोकण आणि गोव्यात, सौराष्ट्र आणि कच्छ मध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार तर तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पूर्व राजस्थान आणि गुजरात भागात मुसळधार ते अतिमुसळधार आणि तुरळक ठिकाणी अतिजास्त मुसळधार पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्रावर नैऋत्य आणि पश्चिम मध्य भागावर ताशी ५०-६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता.
गुजरात, महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर वाऱ्यांचा वेग ताशी ४५-५५ किमी. या काळात या भागातील मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा आहे
१६ ऑगस्ट ( चौथा दिवस): सौराष्ट्र आणि कच्छमध्ये तुरळक ठिकाणी अतिजास्त मुसळधार पावसासह इतर ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता. गुजरातमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता. कोकण आणि गोव्यातही मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाची शक्यता, मध्य महाराष्ट्रात घाटमाथ्यावर, मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता.
अरबी समुद्रावर नैऋत्य आणि पश्चिम मध्य भागावर ताशी ५०-६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता.
गुजरात, महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर वाऱ्यांचा वेग ताशी ४५-५५ किमी. या काळात या भागातील मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा
१७ ऑगस्ट (पाचवा दिवस): सौराष्ट्र आणि कच्छमध्ये तुरळक ठिकाणी अतिजास्त मुसळधार पावसासह इतर ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, गुजरातमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता कोकण आणि गोव्यातही मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाची शक्यता, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात घाटमाथ्यावर, मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता.
अरबी समुद्रावर नैऋत्य आणि पश्चिम मध्य भागावर ताशी ५०-६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता .
गुजरात, महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर वाऱ्यांचा वेग ताशी ४५-५५ किमी. या काळात या भागातील मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा