नाशिक – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आता जिल्ह्यातील काही ठिकाणी उत्स्फूर्त जनता कर्फ्यू ठेवण्यात येत आहे. ग्रामीण भागात संसर्ग पसरत असतांना खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील ग्रामीण भागात जनता कर्फ्यू पाळला जात असल्याचे दिसून आले आहे.
सिन्नर येथील नांदूर शिंगोटे येथे २८ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर असा आठवडाभर कर्फ्यू पाळला जात आहे. सिन्नर तालुक्यात गेल्या महिन्याभरापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे आढळून आले. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिकांच्या पुढाकाराने जनता कर्फ्यू पाळला जात आहे. याकाळात केवळ अत्यावश्यक सेवा सुरु असून इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. नांदूर शिंगोटे येथील ग्रामपंचायत आणि स्थानिक दुकानदारांच्या पुढाकाराने जनता कर्फ्यू पाळला जात आहे. वैद्यकीय सुविधा, भाजीपाला अशा अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्यात आल्या आहेत.
त्याचप्रमाणे देवळा तालुक्यातील स्थानिक व्यापाऱ्यांच्या पुढाकाराने येत्या बुधवार पासून आठवडाभर कर्फ्यू पळला जाणार आहे. तसेच रविवारी देवळा गावात गेल्या रविवारी ५० संशयीत रुग्ण आढळून आले असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती देवळा तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी सुभाष मांडके यांनी दिली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग कमी करण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने मास्क वापरणे तसेच सॅनिटायझरचा वापर करणे अशा सूचना गावकऱ्यांना दिल्या असून स्थानिक व्यावसायिकांनी आठवडाभर दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले.
काही दिवसांपूर्वी येवला तालुक्यातील काही गावांत जनता कर्फ्यू पाळण्यात आला होता त्याच धर्तीवर कळवण तालुक्यात देखील जनता कर्फ्यू पाळण्यात आला असल्याने संसर्ग १० टक्क्यांनी कमी झाला असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.