नाशिक – कोविड-19 महामारीच्या प्रतिबंधासाठी सिरम इन्स्टीट्युट ऑफ इंडिया, पुणे या कंपनीची ‘कोविड शिल्ड’ लस तयार करण्यात आली आहे. जिल्ह्यासाठी ४३ हजार ४४० डोसेजेस उपलब्ध करून देण्यात आले असून महानगरपालिका व ग्रामीण भागातील एकूण १३ लसीकरण केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.
जिल्ह्यासाठी ४३ हजार ४४० डोसेजेस प्राप्त झाले आहेत. या कोविड-19 लसीकरणासाठी जिल्हा रुग्णालय नाशिक, सामान्य रुग्णालय मालेगाव, उपजिल्हा रुग्णालय कळवण, उपजिल्हा रुग्णालय निफाड, उपजिल्हा रुग्णालय चांदवड, उपजिल्हा रुग्णालय येवला, इंदिरा गांधी हॉस्पिटल नाशिक, शहरी आरोग्य केंद्र नवीन बिटको नाशिक, शहरी आरोग्य केंद्र जे. डी. सी बिटको नाशिक, शहरी आरोग्य केंद्र कॅम्प वॉर्ड मालेगाव, शहरी आरोग्य केंद्र निमा १ मालेगाव, शहरी आरोग्य केंद्र रमजानपुरा मालेगाव, शहरी आरोग्य केंद्र सोयगाव, मालेगाव अशा महानगरपालिका व ग्रामीण भाग मिळुन जिल्ह्यात एकूण १३ ठिकाणी लसीकरणासाठी केंद्र निश्चित करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले आहे.
लसीकरण केंद्रांवर आवश्यक तापमान निश्चित करून व्हॅक्सीन व्हॅनच्या सहाय्याने आज प्राप्त झालेल्या लसी वेळेत पोहचविण्यात येणार आहेत. जेणेकरून कोविड महामारीच्या प्रतिबंधासाठीचा शेवटचा टप्पा असणारे लसीकरण १६जानेवारीपासून सुरू होणार आहे. यापूर्वी जिल्ह्यातील १६ लसीकरण केंद्रांना राज्य शासनामार्फत मंजुरी देण्यात आली होती, त्यापैकी आता वरीलप्रमाणे १३ केंद्रांना मंजुरी देण्यात आली असल्याने नियोजित केल्यानुसार वरील केंद्रांवर लसीकरण सुरू करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले आहे.