नाशिक – जिल्ह्यात कोरोनाबाधितांचे कमी होणारे प्रमाण तसेच जिल्ह्याचा मृत्यूदर देखील राज्याच्या तुलनेत कमी असणे ही समाधानाची बाब आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय व सबलीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यावेळी केले. आज शासकीय विश्रामगृह येथे घेण्यात आलेल्या कोरोना आढावा बैठकीत राज्यमंत्री रामदास आठवले बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त भगवान वीर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. के. आर. श्रीवास, सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे आदी उपस्थित होते.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्री. आठवले म्हणाले, केंद्र सरकारमार्फत कोरोनाच्या कालावधीत सर्वच राज्यांना अन्न धान्याचा पुरेसा पुरवठा करण्यात येत आहे. आणि सद्यस्थितीत लॉकडाऊन शिथिल करण्यात आले असले तरी नागरीकांनी कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचेही मंत्री रामदास आठवले यांनी यावेळी सांगितले आहे.
यावेळी माहिती सांगतांना जिल्हाधिकारी मांढरे म्हणाले, कोरोना बाधितांचे प्रमाण कमी होण्यासोबतच जिल्ह्यात रुग्णांसाठी १० मेट्रीक टन ऑक्सिजनचा साठा मुबलक प्रमाणत उपलब्ध आहे. उद्योगांना देखील पर्याप्त ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. रेमडिसिव्हीर इंजेक्शनचा साठा देखील आवश्यकतेनुसार उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे राज्यात राबविण्यात येणारी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिम यशस्वीरित्या राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत सर्वेक्षणाची पहिली फेरी पूर्ण झाली असून या फेरीत साधारण ४ हजार २०३ बाधित रुग्ण आढळून आले असल्याने संसर्गाचा वाढता धोका आटोक्यात आणण्यास यश मिळाले आहे. तसेच या मोहिमेच्या दुसऱ्या फेरीचे सर्वेक्षण सद्यस्थितीत सुरू असल्याची देखील माहिती यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांचे समोर सादर केली आहे.
सामाजिक न्याय विभागाचा आढावा
समाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या भारत सरकार शिष्यवृत्ती मॅट्रिकपूर्व व मॅट्रिकोत्तर योजना, अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत घडलेले गुन्हे व त्याअंतर्गत देण्यात आलेले अर्थसहाय्य, मातोश्री वृद्धाश्रम आदी योजनांचा आढावा घेण्यात आला. याअनुषंगाने प्रलंबित प्रकरणाची माहिती सादर करण्यात यावी, अशा सूचना राज्यमंत्री श्री. आठवले यांनी यावेळी दिल्या आहेत.