सूक्ष्म पद्धतीने नियोजन करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश
नाशिक – गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जून व जुलै महिन्यात पाऊस कमी झाल्यामुळे, सद्यपरिस्थिती पाहता चिंतेचे वातावरण तयार झालेले आहे. जिल्ह्यातील उपलब्ध धरणसाठा लक्षात घेऊन पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याच्या आरक्षणाचे सूक्ष्म नियोजन करण्यात यावे, अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.
जिल्ह्यातील पाऊस परिस्थिती, धरणसाठा, पीक परिस्थिती आणि जिल्ह्यातील अन्नधान्य पुरवठा आदी बाबींच्या आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी पालकमंत्री म्हणाले की, जिल्ह्यात आजपर्यंतची पावसाची टक्केवारी ४७ टक्के असून, धरणासाठादेखील समाधानकारक नाही, ही जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत चिंतेची बाब आहे. पाणी काटकसरीने वापरण्याबाबत जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका यांना योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात याव्यात असे त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितले.
जिल्ह्यातील पुरवठाविषयक माहिती देताना जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर यांनी जिल्ह्यात सध्या ३५ हजार मेट्रिक टन धान्य साठवणूक क्षमता आहे. यामध्ये कोविड कालखंडात १४ हजार मेट्रिक टन साठवणूक क्षमता वाढवली आहे. जिल्ह्यात आणखी २५ हजार मेट्रिक टन धान्य पुरवठ्याची क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती दिली.
गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी
जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता अलका अहिरराव यांनी जिल्ह्यातील धरणातील आजचा उपलब्ध पाणी साठ्याबाबत माहिती देताना गंगापूर धरण ५२ टक्के, काश्यपी २४ टक्के, मुकणे २८ टक्के, भावली ८९ टक्के, दारणा ६९ टक्के, वालदेवी ३४ टक्के, पालखेड ३२ टक्के, करंजवण १८ टक्के, वाघाड १८ टक्के, ओझरखेड ४० टक्के, तीसगाव ८ टक्के व पुणेगाव ११ टक्के पाणीसाठा असल्याचे सांगितले. गेल्या वर्षीत तुलनेत हा उपलब्ध साठा फारच कमी असल्याचे त्यांनी सांगितले.
पेरण्या समाधानकारक
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ यांनी यावेळी कृषी विभागाचा आढावा सादर केला. जिल्ह्याच्या पूर्व भागात समाधानकारक पाऊस झाला असून, जिल्ह्यात भात लावणी वगळता सर्व पेरण्या समाधानकारक झालेल्या आहेत. जिल्ह्यात खतांचा मुबलक साठा असून, यात युरियाचा १०८ टक्के अधिकचा साठा उपलब्ध आहे. ५१२ मे.टन बफर साठ्यापैकी ३०० मे.टन बफर स्टॉकचे वितरण झाले असून, २१४ मे.टन साठा हा वाटपासाठी शिल्लक आहे. जिल्ह्यात हेक्टरी मका पेरणी १०७ टक्के, एकूण तृणधान्ये पेरणी ८२.८४ टक्के, तूर पेरणी ६३.८६ टक्के, भात लावणी ५६.५२ टक्के, ज्वारी पेरणी २७७.५८ टक्के, बाजरी पेरणी ७१.२२ टक्के, नाचणी पेरणी ३०.७४ टक्के, भुईमूग पेरणी ९८.०८8 टक्के, कापूस पेरणी ९५.०५ टक्के झाली असल्याचे सांगितले.