इगतपुरी – महाराष्ट्र राज्य नोंदणी व मुद्रांक विभाग अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटनेमार्फत मांडलेल्या विविध मागण्या ३ वर्षांपासून प्रलंबित आहेत. या संदर्भात अनेकदा निवेदने सादर दिलेली आहेत. मात्र शासनाला जाग येत नसल्याने इगतपुरीसह जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयात उद्या १ ऑक्टोबर पासून बेमुदत लेखणीबंद आंदोलन करण्यात येणार आहे. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गजानन खोत, कार्याध्यक्ष अशोकराव चव्हाण, सचिव सागर पवार यांनी याबाबत प्रसिद्धी पत्रकान्वये माहिती दिली. लेखणीबंद आंदोलनामुळे जिल्हाभरात काम ठप्प होणार असून दस्त नोंदणीसाठी नागरिकांनी येऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.
सर्व संवर्गातील रखडलेल्या पदोन्नत्या तात्काळ कराव्यात, कोरोना महामारीमुळे मुद्रांक विभागातील सर्व कर्मचारी शासनाचे ३० टक्के उपस्थितीचे आदेश असताना १०० टक्के उपस्थितीमध्ये काम करत आहेत. मात्र विभागातील कर्मचाऱ्यांसाठी मागणी करुन सुद्धा जीवन सुरक्षा विमा कवच लागू केलेले नाही. कोविडमुळे आतापर्यंत ६ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालेला आहे. तुकडेबंदी कायद्याने होणाऱ्या कारवाया, रेरा कायद्यामध्ये होणारी कार्यवाही, सह दुय्यम निबंधक वर्ग-२ व दुय्यम निबंधक श्रेणी-१ संवर्गाचे एकत्रीकरण व्हावे, हार्डवेअर आदि साहीत्य मिळावे, आयकर विवरणपत्र, पोलीस आणि इतर विभागाकडून मागणी केल्या जाणाऱ्या माहिती बाबत, ई सरिता, ,E-Mutation, Gras व आधार सर्व्हरबाबत विविध मागण्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. यासह शासनाकडून दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये कोणत्याही सोयी
सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत. या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य नोंदणी व मुद्रांक विभाग अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटना यांनी उद्या १ ऑक्टोबर पासून बेमुदत लेखणीबंद आंदोलन सुरू करणार आहे.
नोंदणीसह कार्यालयात कोणतेही कामकाज होणार नाही
विविध मागण्यांबाबत शासनाला जाग यावी म्हणून बेमुदत लेखणीबंद आंदोलन उद्यापासून करीत आहोत. यामुळे दस्त नोंदणीसह कार्यालयात कोणतेही कामकाज होणार नाही. नागरिकांनी याबाबत संघटनेला सहकार्य करावे.
– ई. डी. देवशी, दुय्यम निबंधक इगतपुरी