नाशिक – जिल्ह्यातील कोविड सेंटरर्सवर नजर ठेवण्यासाठी व तेथिल रूग्ण व त्यांच्या उपचारांमधील पारदर्शकता वाढविण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून कोविड सेंटर्सवर आता सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.
या संदर्भात माहिती देताना जिल्हाधिकारी मांढरे म्हणाले की, नाशिक जिल्ह्यासाठी जिल्हास्तरावरील स्वतंत्र कोविड उपचार केंद्र जिल्हा सामान्य रुग्णालयातील चार मजली कुंभमेळा इमारतीत मध्ये सुरु आहेत. तेथील रुग्णांना देण्यात येणाऱ्या उपचार व पुरविण्यात सोयी सुविधा यांचेवर संपूर्ण देखरेख व निगराणी रहावी यासाठी संपूर्ण चार मजली कोविड उपचार रुग्णालय, त्यातील वरांडा व उदवाहने या मध्ये सीसीटीव्ही यंत्रणा स्थापित करण्याबाबतचे आदेश कार्यकारी अभियंता, सा. बां. विद्युत विभाग, नाशिक दयानंद बहात्रे यांना कोविड आढावा बैठकीत दिले होते. त्यानुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाद्वारे आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात आली.
सदर कामास लागणाऱ्या रु. ४ लाख ५३ हजार रुपयांच्या निधीस त्वरीत मान्यता देण्यात आली होती. त्यानुषंगाने सार्वजनिक विद्युत विभागाद्वारे सदर काम तत्परतेने पूर्ण केले असून आज रोजी एकूण २० सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित केले आहेत. तसेच सीसीटीव्ही डिस्प्ले टीव्ही थेट जिल्हा शल्य चिकित्सक यांचे दालनात लावण्यात आला आहे.
त्यामुळे आता जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड रुग्णालयामधील सर्व कोविड वॉर्ड, अतिदक्षता कक्ष, वरांडा, उद्वाहने यावर सीसीटीव्हीच्या माध्यमातून जिल्हा शल्य चिकित्सक, नाशिक यांची थेट निगरानी राहाणार असून त्यामुळे निश्चितच रुग्णालयातील उपचाराची कार्यक्षमता आणखीन चांगली होण्यास मदत होणार आहे, असेही जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.