नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयातील लॅबची क्षमता ८०० ची आहे. पंरतु तिथे आता automatic extraction machine स्थापन झालेले असून त्याचे कॅलिब्रेशनचे काम सुरु आहे. व्यवस्था कार्यान्वित झाल्यानंतर स्वाब टेस्टिंग ची क्षमता ५ हजाराच्यावर जाणार आहे. तसेच बिटको हॉस्पिटल मधील लॅब चे गतीने काम करण्यात येणार आहे. २५ मार्चच्या आत बिटकोची लॅबही सुरु करण्यात येणार आहे. तिची क्षमता ५ हजार असणार आहे. अशाप्रकारे दिवसाला १० हजार नमुन्यांची तपासणी करु शकणार असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. तसेच या लॅबची क्षमता वाढल्याने कॉन्टक्ट ट्रेसिंग व स्वॉब तपासणी काम खूप सोपे होणार आहे.
गर्दीवर टाकण्यात आलेल्या निर्बंधावर नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे त्या निर्बंधात कोणतीही वाढ किंवा घट करण्यात येणार नाही. ते निर्बंध तसेच पुढे चालु राहतील. तसेच मास्कच्या बाबतीत सुरुवातीला अतिशय मोठ्या प्रमाणात वैशिष्ट्य दिसून येत असल्याने एक हजार रुपये दंड करण्यात येत होता. यामध्ये नागरिकांना भुर्दंड बसवणे हा हेतू नसून नागरिकांमध्ये या विषयाबाबत तातडीने जागृती निर्माण करणे हा हेतू होता. याबाबत क्षेत्रीय स्तरावर नागरिकांत मध्ये अपेक्षित परिणाम आता दिसून येऊ लागल्याने तो सर्वत्र दोनशे रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच होमआयसोलेशनमध्ये राहणारे रुग्ण नियमांचे उल्लंघन करतांना आढळून आल्यास त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन बाबत फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्कालीन व्यवस्थापन केंद्राच्या प्रमुखांची बैठक विभागीय आयुक्त राधाकृष्ण.गमे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, पोलीस उपायुक्त बारकुंड, अप्पर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे, आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाच्या समन्वयक उपजिल्हाधिकारी वासंती माळी आदी उपस्थिती होते.
आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष मागील अनुभवाचे आधारे प्रभावी काम करेल – गमे
गेल्यावर्षी कोरोना व्यवस्थापनामध्ये या आपत्कालीन व्यवस्थापन केंद्राने खूप चांगली भूमिका निभावली होती. त्यामुळे आजची कोरोनारुग्णांची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता आज कार्यान्वित झालेला आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष प्रभावीपणे काम करेल असे मत विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी व्यक्त केले. यावेळी गमे म्हणाले, यावेळी होमआयसोलेशन बाबत विशेष काळजी घेण्यात येणार आहे. लसीकरणाचा ड्राईव्ह सुध्दा सुरु आहे. त्याचप्रमाणे कोविड केअर सेंटर, डीसीएच, डीसीएसी याची जी रचना मागच्यावेळी करण्यात आली होती. त्यावेळेला ज्या भागात रुग्ण संख्या जास्त होती अशा ठिकाणी करण्यात आली होती. परंतु आता वेगळ्या भागातून रुग्णसंख्या आढळून येते असल्याने त्यानुसार कोविड केअर सेंटरची रचना करण्यात यावी अशी सूचनाही यावेळी श्री. गमे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिली. पोलीस विभागाने आपत्ती व्यवस्थापन कायदा संदर्भात सर्व निर्बंधची प्रभावी अंमलबजावणी स्वयंस्फूर्तीने करावी व त्याबाबतचे दैनंदिन अहवाल आपत्कालीन व्यवस्थापन केंद्राकडे पाठवावेत अशा सूचना विभागीय आयुक्त गमे यांनी पोलीस विभागाला दिल्या.