नाशिक : जिल्हा रुग्णालयातील कोरोना सेंटरमधील रेमडेसिवीर इंजेक्शनची बाहेर विक्री करणार्या कंत्राटी कर्मचार्याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कर्मचार्यास जिल्हा रुग्णालयातून कामावरुन कमी केले आहे. संशयित दीपक सातपुते असे अटक केलेल्याचे नाव आहे.
जिल्हा रुग्णालयातील कोरोना सेंटरमधील रेमडेसिवीर इंजेक्शन बाहेर विक्री होत असल्याची तक्रार जिल्हाधिकारी सूरज मांढरे आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे यांना प्राप्त झाली होती. त्यानुसार जिल्हाधिका-यांनी तत्काळ चौकशीचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सकांना दिले होते. डॉ. रावखंडे यांनी चौकशी समिती गठीत तपास सुरु केला. यामध्ये संशयित दीपक सातपुते एक इंजेक्शन बाहेर विक्री केल्याची कबुली दिली. याप्रकरणी जितेंद्र सोनवणे यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयित दीपक गणेश सातपुते, कार्तिक किशोर सोनार (रा.दाड बुद्रूक, ता. राहता, जि. अहमदनगर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सातपुते याला अटक केली आहे.