नाशिक – बनावट दस्तऐवज तयार करुन जागेचे खरेदीखत केल्याच्या तक्रारीवरुन सरकारवाडा पोलीस ठाण्यात जिल्हा बँकेचे संचालक परवेज युसुफ कोकणी यांच्यासह महादु भावदु नारळे, एम. एस. मिर्झा व ॲड. ए. आय. शेख यांच्याविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी इमरान गुलाम गौस कोकणी (४०) यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत म्हटले आहे की, २०१३ साली त्यांनी वडिल व पाच भाऊ यांनी मिळून जागा खरेदी केली होती. त्यानंतर ही जागा १७ ऑगस्ट २०१७ रोजी त्यांनी विक्री केली. त्यानुसार खरेदी केलेल्या व्यक्तीने महानगरपालिकेकडून परवानगी घेत बांधकाम सुरु केले. मात्र परवेज कोकणी यांनी जागेत कोणताही मालकी हक्क नसताना बनावट खरेदीखत करुन न्यायालयात दावा दाखल केला. त्यामुळे इमरान कोकणी यांनी कागदपत्रांची पाहणी केली असता संशयितांनी २३ मे २०११ रोजी इमरान यांच्या नावे खोटे जनरल मुखत्यार पत्र करुन पैसे भरल्याची पावतीही केली. सप्टेंबर २०११ रोजी नोटरी वकील ए. आय. शेख यांनी तयार केलेल्या साठेखत करारनाम्यावर इमरान व परवेज कोकणी यांच्यात करार झाल्याचे दाखवण्यात आले. त्यावर साक्षीदार म्हणून महादु नारळे व एम. मिर्झा यांच्या स्वाक्षरी आहेत. तसेच इमरान यांच्या जागेबाबत न्यायालयीन वाद निर्माण करण्याच्या हेतूने बनावट दस्तऐवज तयार करीत संशयितांनी फसवणूक केल्याचा आरोप इमरान यांनी केला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस तपास करीत आहेत.