नाशिक – जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाज कल्याण विभागातर्फे दिव्यांग बांधवांना स्वावलंबन कार्डचे वाटप प्रातिनिधिक स्वरूपात करण्यात आले. पाच दिव्यांग बांधवांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या हस्ते ते देण्यात आले.
शासकीय अथवा खाजगीस्वरूपाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग बांधवांना वेळोवेळी कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागते, बऱ्याचदा दिव्यांग व्यक्तींना कागदपत्र हाताळताना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागतो, अशावेळी केंद्रीय स्तरावर एक कार्ड एक ओळख असणारे हे युडीआयडी कार्ड हे दिव्यांग बांधवांना फायदेशीर ठरणार आहे. या कार्डवर दिव्यांग व्यक्तीची संपूर्ण माहिती असून संपूर्ण देशपातळीवर वेगळा असा युनिक आयडी क्रमांक देण्यात आला असून त्या कार्डवर कुठल्या प्रकारचे अपंगत्व त्याचबरोबर अपंगत्वाचे प्रमाण हे देखील नमूद करण्यात आले आहे. दिव्यांगांना शासकीय अथवा बिगर शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी या कार्डचा फायदा होणार आहे. त्याचबरोबर केंद्रीय पातळीवर संपूर्ण देशातल्या त्याचबरोबर राज्यातल्या दिव्यांगजनांची माहिती ही यामुळे सरकारकडे उपलब्ध असणार आहे, केंद्र आणि राज्य स्तरावर दिव्यांगांसाठी करावयाच्या उपाययोजनांसाठी सदरील माहिती ही उपयुक्त ठरणार आहे. संपूर्ण जिल्ह्यात एकूण १६००० दिव्यांग बांधव असुन असून कोविड १९ आजाराच्या परिस्थितीमुळे त्यापैकी १३०० दिव्यांग बांधवांचे कार्ड हे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडे प्राप्त झाले आहेत, यापैकी नाशिक शहरातल्या ३७७ दिव्यांगजनांना युडीआयडी कार्डचे वाटप करण्यात येणार आहे तर जिल्ह्यातल्या इतर तालुक्यांमधील स्वावलंबन कार्डचे वाटप हे पंचायत समिती स्तरावर करण्यात येणार आहे. दिव्यांग बांधवांना तत्परतेने यूडीआयडी कार्डचे वाटप करणारी नाशिक जिल्हा परिषद ही पहिलीच जिल्हा परिषद असल्याचं प्रतिपादन यावेळी प्रहार दिव्यांग संस्थेचे जिल्ह्याध्यक्ष दिलीप दिघे यांनी यावेळी केले. त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या दिव्यांग मदत व सल्ला केंद्राच्या बाहेर दिव्यांगांना व्हील चेअर आणि बसण्यासाठी आसनव्यवस्थेची मागणी केली असता मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ही मागणी तात्काळ मान्य करत दिव्यांग मदत व सल्ला केंद्राच्या बाहेर आसन व्यवस्था व दिव्यांगांना सोयीसाठी व्हील चेअर उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले, यामुळे दिव्यांग बांधवांनी मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांचे आभार मानत समाधान व्यक्त केले. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, समाज कल्याण अधिकारी रवींद्र परदेशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे, वित्त व लेख अधिकारी बच्छाव, समाज कल्याण विभागाच्या कार्यालयीन अधीक्षक वाझट मॅडम त्याच बरोबर प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाअध्यक्ष दिलीप दिघे, कार्याध्यक्ष बबलू मिर्जा, रवींद्र टिळे, पंकज सूर्यवंशी, ललित पवार यांसह शहरातील दिव्यांग बांधव आणि जिल्हा परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.
स्वावलंबन कार्ड लाभार्थ्यांची नावे –
गोविंद मुसळे ( अंध प्रवर्ग )
अशोक गायकवाड (अस्थिव्यंग )
स्वप्नील जाधव ( बौद्धिक अक्षमता )
हिमांशू गोस्वामी ( बौद्धिक अक्षमता )
ऋषिकेश खैरनार ( बौद्धिक अक्षमता )
कसे काढणार कार्ड –
1) www.swavlambancard.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाइन माहिती भरावी
2) त्यानंतर जिल्हा शासकीय रूग्णालयाद्वारे होणार दिव्यांग पडताळणी
3) केंद्रीय स्तरावरुन जिल्हा समाज कल्याण कार्यालयाकडे स्वावलंबन कार्ड आल्यानंतर समाज कल्याण कार्यलयामार्फत होणार वितरण.
कुठे होणार फायदा –
शासकीय स्तरावर दिव्यांगांसाठी राबवल्या जाणाऱ्या २५ सामूहिक योजना व वैयक्तिक स्वरूपाच्या ३५ योजनांचा लाभ घेण्यास होणार मदत
जिल्हा परिषदेतर्फे अपंग कल्याण निधी १०० टक्के खर्च –
पंचायत राज संस्थांनी त्यांच्या स्वउत्पन्नातून ५ टक्के निधी हा अपंग कल्याणासाठीच्या योजनांवर खर्च करण्यात यावा असा शासन निर्णय आहे जिल्हा परिषद नाशिकतर्फे २०१९-२० वर्षाच्या ५ टक्के अपंग कल्याण निधीचा पूर्ण विनिमय झाला असून पुढील वर्षाच्या निधी खर्चाचे नियोजन सध्या सुरु आहे, अपंग कल्याणासाठीचा संपूर्ण निधी १०० टक्के खर्च करणारी नाशिक जिल्हा परिषद ही राज्यात अव्वल ठरली आहे.