नाशिक – मुक्त विद्यापीठाच्या परिक्षा संपूर्ण ऑनलाईन होण्यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सुचवलेला पर्याय उत्तम असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. म्हणूनच या प्रस्तावाची शिफारस करणार असल्याचे सामंत यांनी सांगितले आहे.
राज्यात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. नाशिक जिल्ह्यांच्या ती एक चिंतेची बाब झाली आहे. अशा परिस्थितीत सुमारे ४० हजार विद्यार्थी ६ ते ७ दिवस परिक्षेच्या निमित्ताने एकत्र येत असतील तर ते कोरोनाकाळात अत्यंत चिंतेचा विषय ठरू शकतो. त्यासाठी ऑफलाईन परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन परिक्षेच्या प्रवाहात कसे आणता येईल यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची सूचना याबैठकीत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केली. त्यासाठी जिल्ह्यात असलेल्या ३० हजार आपले सरकार केंद्र/ ई सेवा केद्रांच्या सहाय्याने अथवा तहसील कार्यालयात उपलब्ध असलेल्या पर्यायी ऑनलाईन पद्धतीने परिक्षार्थींना परिक्षा देण्यासाठी जिल्हा प्रशासन १०० टक्के सहकार्य करेल अशी ग्वाही वजा पर्याय मांढरे यांनी देताच मंत्री उदय सामंत यांनी या संकल्पनेचे कौतुक करतानाच ती तात्काळ उचलून धरली व ती राज्यात सर्वत्र लागू करण्याच्या दृष्टीने राज्याच्या मुख्य सचिवांना प्रस्ताव तात्काळ सादर करण्याच्या सूचना देताना त्यासाठी आपण शिफारस करणार असल्याचेही सांगितले.
सुरू करणार कृषी विषयक अभ्यासक्रम
मुक्त विद्यपीठात यापूर्वी काही कृषी अभ्यासक्रम सुरू होते. परंतु मधल्या कालखंडात युजीसी ने त्यांना तांत्रिक कारणास्तव सुरू ठेवण्यास मान्यता दिलेली नाही. परंतु विद्यापीठाने यापूर्वी त्या अभ्यासक्रमांच्या माध्यमातून त्यांच्या आवारात सुरू केलेले कृषी विज्ञान केंद्र व त्या माध्यमातून यशस्वी केलेले प्रयोग पाहता शासनाच्या माध्यमातून काही अभ्यासक्रम सुरू करण्याचा आमचा विचार असून, जुन्या अभ्यासक्रमांना केंद्र सरकारच्या माध्यमातून मान्यता मिळावी यासाठी प्रयत्न सुरू असून त्याबात मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, माजी मुख्यमंत्री शरद पवार यांच्याशी चर्चा झाली असल्याचे सांगून विद्यापीठाने आपल्याकडील मुदत ठेवींच्या माध्यमातून विद्यार्थी कल्याण तसेच विद्यापीठाच्या विस्तारीकरणाचा विचार करावा व त्यासाठी शासनाशी समन्वय वाढवावा अशाही सूचना यावेळी मंत्री श्री. सामंत यांनी दिल्या आहेत.
गुणपत्रक बाधित असणार नाही
कोरोना काळात घेतल्या जाणाऱ्या कुठलेही गुणपत्रक अथवा पदवी प्रमाणपत्र कोरोना कालखंडातील म्हणून बाधित केले जाणार नाही, अथवा त्यावर कुठलाही तशाप्रकारचा उल्लेख केला जाणार नसून नियमित परिक्षांच्या गुणपत्रक व प्रमाणपत्राप्रमाणे ते असतील, त्याबात राज्यस्तरावरून व्यापक जागृती व प्रसिद्धी मोहिम राबविण्यात यावी अशाही सूचना विद्यापीठाच्या जनसंपर्क कक्षाला सामंत यांनी यावेळी केल्या आहेत.