नाशिक – कोरोना महामारीला प्रतिबंध करण्यासाठी आजपासून देशपातळीवर कोविड लसीकरणाचा प्रारंभ करण्यात आला आहे. जिल्ह्यातील १३ केंद्रावर देखील लसीकरण मोहिमेचा पहिला टप्पा पार पडला. लसीकरण मोहिमेच्या पहिल्या दिवशी एकूण ७४५ आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. जिल्ह्यात सरासरी ५७ टक्के लसीकरण झाले आहे. जिल्ह्यातील सर्व केंद्रावर लसीकरण प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.
जिल्ह्यात मालेगाव येथील कॅम्प वॉर्ड केंद्रावर सर्वाधिक ८० टक्के लसीकरण झाले आहे. त्याखालोखाल मालेगाव येथील सोयगाव शहरी आरोग्य केंद्रावर ७७ टक्के, उपजिल्हा रूग्णालय निफाड येथे ७६ टक्के तर सामान्य रुग्णालय मालेगाव येथे ७० टक्के लसीकरण पार पडले आहे.
दिवसभरात झालेल्या कोरोना लसीकरणाची माहिती देतांना जिल्हाधिकारी श्री. मांढरे म्हणाले, आज नाशिक जिल्हा रुग्णालयात ४९% आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली आहे. शहरातील इंदिरा गांधी हॉस्पिटल येथे ३४%, शहरातील नवीन बिटको येथील शहरी आरोग्य केंद्र येथे ६०%, शहरातील जेडीसी बिटको येथील शहरी आरोग्य केंद्र येथे ३३%, मालेगाव येथील सामान्य रुग्णालय येथे ७०%, मालेगाव येथील निमा १ शहरी आरोग्य केंद्र येथे ४६%, मालेगाव येथील रमजानपुरा शहरी आरोग्य केंद्र येथे ४४%, मालेगाव येथील सोयगाव शहरी आरोग्य केंद्र येथे ७७%, उपजिल्हा रुग्णालय कळवण येथे ६४%, उपजिल्हा रुग्णालय निफाड येथे ७६%, उपजिल्हा रुग्णालय चांदवड येथे ६०% आणि उपजिल्हा रुग्णालय येवला येथे ५२% आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले आहे.
पहिल्या टप्प्यात एकूण ७४५ आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये अपेक्षित प्रमाणात लसीकरण झालेले नसल्याने याबाबत कारणे शोधणे आवश्यकच आहे. काही कारणास्तव ज्या लाभार्थ्यांना लसीकरणाचा लाभ घेता आला नाही अथवा जे लसीकरण साठी केंद्रावर आले नाहीत ती कारणे प्रशासनाच्या वतीने जाणून घेतली जातील. लसीकरणादरम्यान प्रतिकूल परिणामाची सोम्य लक्षणे दिसणे अभिप्रेत होते व त्याप्रमाणे प्रत्येक केंद्रावर तयारी देखील ठेवण्यात आलेली होती. जिल्ह्यातील ७४५ पैकी केवळ १० व्यक्तींना लसीकरणानंतर किरकोळ प्रतिकूल परिणाम दिसून आला त्याना अपेक्षित उपचार दिल्यानंतर कोणताही त्रास जाणवला नाही.