मनमाड – मनमाड पाठोपाठ लासलगाव, नांदगाव यासह नाशिक जिल्ह्यातील १५ बाजार समिती व ४ उपबाजार समिती येथील कांदा लिलाव बंद ठेवण्यात आले आहे. समित्यात अचानक लिलाव बंद ठेवण्यात आल्यामुळे शेतक-यांचा गोंधळ उडाला. कांद्याला चांगला भाव मिळत असतांना आता लिलाव बंद ठेवण्यात आल्यामुळे शेतक-यांची चिंता वाढली. कांदा विकावा कुठे असा प्रश्न पडला शेतकऱ्यांना पडला आहे.
रविवारी बंद बंद असा मेसेज फिरत होता. त्यानंतर महाराष्ट्रातील एकही बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद राहणार नाही, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिली आहे. ‘बंद बंद बंद’, अशाप्रकारे जो काही मेसेज राज्यभरात सोशल मीडियावर फिरत आहे त्या मेसेजचा आणि महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा कुठलाही संबंध नसल्याचेही सांगितले होते. पण, सोमवारी व्यापा-यांनीच लिलावात सहभाग न घेतल्यामुळे हे लिलाव बंद झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान व्यापा-यांनी आमच्याकडे पुरेसा स्टॅाक असल्यामुळे तो जोपर्यंत संपत नाही. तोपर्यंत लिलावात कांदा आम्हाला घेता येणार नसल्याचे सांगितले.
केंद्र सरकारने कांद्याला निर्यात बंदी करून परदेशातील कांदा आयात करण्याचा आदेश काढून तसेच कांद्याचे किरकोळ साठी २ टनाचे आणि होलसेल साठी २५ टनांचे स्टॉक लिमिटची मर्यादा घालून दिल्याने हा गोंधळ उडाला असल्याचे बोलले जात आहे.