जालना : आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली जालना येथे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक सुरू होती, त्याचदरम्यान एका शेतकऱ्याने विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.
अचानक घडलेल्या या घटनेमुळे अधिकाऱ्यांची एकच धांदल उडाली.
सेवली शिवारातील पाथरूड गावाचा रहिवासी विलास राठोड या शेतकऱ्याची सावकाराने जमीन हडपली असून यासंदर्भात वारंवार तक्रारी करून देखील महसूल आणि पोलीस प्रशासन काहीच कारवाई करत नसल्याने संतप्त झालेल्या या शेतकऱ्याने जिल्हाधिकारी कार्यालयात राजेश टोपे यांच्या उपस्थितीत होत असलेल्या आढावा बैठकीदरम्यान विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान ,सदर शेतकऱ्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून घटनेनंतर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस लावण्यात आला आहे. टोपे यांच्यासमोर घडलेल्या या प्रकारामुळे प्रशासनाची चांगलीच अडचण झाली आहे