नाशिक – जगावर आलेली कोरोना ही आपत्ती रोखण्यासाठी गेल्या सात महिन्यांपासून सर्वच स्तरांतून प्रयत्न केले जात आहे. या आपत्तीचे इष्टापत्तीमध्ये रूपांतर करण्यासाठी आपण सर्वच प्रयत्नशील आहोत, कोरोनाबधितांवर वेळेवर उपचार होणेसाठी ऑक्सिजनची आवश्यकता लक्षात घेता जाधव गॅस प्लँटने एका दिवसात दोन हजार सिलेंडर भरण्याची क्षमता असलेले युनिट उभे करून कौतुकास्पद काम केले आहे; असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
ते आज आंबेबहुला रस्त्यावर असलेल्या विल्होळी येथील जाधव गॅसेस ऑक्सिजन प्लँट उदघाटन समारंभात बोलत होते. यावेळी नगरसेविका संगीता जाधव, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार नितीन भोसले, जिल्हा उद्योग व्यवस्थापक सतीश भामरे, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त प्रवीण आष्टीकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निखिल सैंदाणे, महानगरपालिका आरोग्य अधिकारी भाऊसाहेब नागरगोजे, नोडल अधिकारी डॉ.आवेश पलोड, उद्योजक धनंजय बेळे, जाधव गॅसेस ऑक्सिजन प्लँटचे संचालक अमोल जाधव, एचपीसीएल कंपनीचे विभागीय व्यवस्थापक प्रलय जांभुळकर, अक्षय जाधव आदी उपस्थित होते.
पालकमंत्री भुजबळ म्हणाले, नाशिक जिल्ह्याला २५ मेट्रीक टन ऑक्सिजन म्हणजे ४ हजार सिलेडंर दररोज लागणार असून विल्होळी येथील ऑक्सिजन प्लँटद्वारे २ हजार ऑक्सिजन सिलिंडर पुरविण्यात येणार आहे. पंरतु डिसेंबर व जानेवारी महिन्यात कोरोनाची लाट येण्याची शक्यता असल्याने जिल्ह्याची आवश्यकता २५ मेट्रीक टन असली तरी ५० मेट्रीक टनाची क्षमता ठेवणे आवश्यक असून त्याप्रमाणे नियोजन करण्यात येणार आहे. लॉकडाऊन काळातही सगळे बंद असतांनाही समाजिक भान ठेवून अतिशय मेहनतीने जाधव यांनी या ऑक्सिजन प्लँट उभारणी केली आहे. भविष्यात या प्रकल्पामुळे जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होणार नसून प्रत्येक रुग्णाला पुरेसा ऑक्सिजन मिळणार असल्याचे पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले.
पुढे बोलताना पालकमंत्री भुजबळ म्हणाले, साधारण गेल्या एक महिन्याची कोरोना संसर्गाची आकडेवारी बघता जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल होत आहे. पण तरी देखील जिल्ह्यात कोठेही ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये, यासाठी जाधव गॅस प्लँट उभारण्याचा निर्णय घेतला होता. यापूर्वी वाढत्या रुग्णांमुळे जिल्ह्यात ऑक्सिजनची मागणी देखील मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्याअनुषंगाने रुग्ण सेवेसाठी ऑक्सिजन निर्मितीची क्षमता वाढविण्यासाठी हा प्लँट उभारण्यात आला. कोविड- १९ च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जाधव गॅसच्या पिनॅकल संस्थेमार्फत अनेक खाजगी व सरकारी रुग्णालयांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या प्लँटच्या माध्यमातून नाशिक शहरात आज वैद्यकीय व उद्योग क्षेत्रासाठी लागणाऱ्या ७० टक्के ऑक्सिजनची गरज पूर्ण होणार आहे. हा प्रकल्प आपल्या जिल्ह्यासोबतच आजूबाजूच्या जिल्ह्यांनाही ऑक्सिजन पुरवू शकेल, अशी अपेक्षाही यावेळी पालकमंत्री श्री.भुजबळ यांनी व्यक्त केली.
कोरोना आपत्तीचे इष्टापत्तीमध्ये रूपांतर करणे म्हणजे जिल्ह्यात आरोग्य हब, वेलनेस हब, आयटी पार्क, शिक्षण हब, कृषी विषयक उद्योग वाढविणे होय आणि त्याच दृष्टीने आपण प्रयत्न करायला हवे. कोरोनाचा प्रदूर्भाव हळू हळू कमी होत असून परंतु कोरोना नंतर भविष्यकाळासाठी आपल्याकडे सक्षम आरोग्य यंत्रणा असायला हवी या दृष्टीने आता आपण प्रयत्न करणे अपेक्षित असल्याचेही पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी नमूद केले.
महानगरपालिकेकडून जागतिक दर्जाच्या सुविधा नाशिकमध्ये उपलब्ध व्हायला पाहिजेत. मुंबईच्या केईएम हॉस्पिटलच्या धर्तीवर आपल्या शहरात मोठे हॉस्पिटल तयार होणे गरजेचे आहे. तालुका स्तरावर सर्वच तालुक्यांच्या ठिकाणी ३० ते ४०ऑक्सिजनयुक्त बेड्स असायलाच पाहिजे; त्यांना ऑक्सिजनची पूर्तता करण्यासाठी ऑक्सिजन तयार करणारे उद्योग देखील गरजेचे आहे आणि त्यामुळेच जाधव गॅस प्लँटचे काम अभिनंदननिय असल्याचेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले.