नाशिक- सध्या राज्यातील एमबीए, फार्मसी, पॉलिटेक्निक, व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरु असून महाविद्यालयांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी शेवटची तारीख देण्यात आली आहे. मात्र आज देखील राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र वेळेत सादर करून देखील समाजकल्याण विभागाकडे प्रलंबित आहे. त्यामुळे जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे राज्यातील एससी. ओबीसी, एनटी प्रवर्गातील हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे. शासनाच्या या दुर्लक्षामुळे या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी राज्य शासनाने तातडीने पावले उचलावीत अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सरचिटणीस तथा आ.प्रा.देवयानी फरांदे यांनी केली.
एआयसीटीने १५ जानेवारी ही मुदत दिलेली असताना व सर्वोच्च न्यायालयाने जात पडताळणी प्रमाणपत्राशिवाय प्रवेश न देण्याची भूमिका स्पष्ट केलेली असताना, एससी. ओबीसी, एनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यासाठी राज्य शासनाकडून दुर्लक्ष करण्यात आले. याबाबत कुठलेही शिबिर घेण्यात आलेले नाही. तसेच राज्य शासनाच्या या दुर्लक्षामुळे एससी. ओबीसी, एनटी. प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याचा धोका निर्माण झालेला आहे.
चार दिवसापूर्वी आ.देवयानी फरांदे यांनी समाज कल्याण मंत्री धनंजय मुंडे व तंत्रशिक्षण मंत्री, उदय सामंत यांना पत्रव्यवहार करून जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्याची विनंती केली होती. परंतु, आ. देवयानी फरांदे यांनी केलेल्या मागणीकडे देखील शासनाने दुर्लक्ष केले. आज आमदार देवयानी फरांदे यांनी नाशिक येथील समाजकल्याण विभागाच्या जात पडताळणी विभागाला भेट दिली. यात अनेक त्रुटी समोर आल्या. जात पडताळणी समित्यांकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. पर्यायी व्यवस्था उपलब्ध नाही. त्यामुळे सकाळी ६.०० वाजेपर्यंत काम करून देखील हजारो जात पडताळणी प्रमाणपत्र प्रलंबित आहे अशी बाब निदर्शनास आली.
राज्य शासनाच्या दुर्लक्षामुळे एस.सी. ओबीसी, एन.टी. प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी आ. देवयानी फरांदे यांनी तत्काळ मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव भूषण गगराणी, समाज कल्याण मंत्री धनंजय मुंडे, उच्च व तंत्रशिक्षण सचिव ओमप्रकाश गुप्ता यांच्याशी संवाद साधून त्यांना नाशिक शहरातील परिस्थितीबाबत अवगत करून दिले. तसेच राज्यात सर्वत्र अशीच परिस्थिती असल्याचे सूचित केले.
यावेळी आ. देवयानी फरांदे यांच्यासोबत भाजपा अनुसूचीत मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष, गणेश कांबळे, शहर इतर मागास प्रवर्ग अध्यक्ष चंद्रकांत थोरात, नगरसेवक अनिल ताजनपुरे, भाजपा अनुसूचीत मोर्चा, शहर सरचिटणीस विजय काळे, विजय बनसोड, आदींसह विद्यार्थी व पालक उपस्थित होते.