वॉशिंग्टन – डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद सोडताना एकूण १४३ लोकांना क्षमा केली आहे. यात त्यांचे व्याही, भ्रष्ट राजकारणी, सुरक्षेची दलाली करणारे, त्यांचे माजी सल्लागार व सहकारी सामील आहेत. हा शक्तीचा दुरुपयोग मानला जात आहे. परंतु, ट्रम्प यांनी टीकांकडे दुर्लक्ष करून वेळेपूर्वी व्हाईट हाऊस रिकामे केले आहे.
१४३ पैकी ७३ लोकांची शिक्षा पूर्णपणे माफ करण्यात आली आहे. तर इतरांची शिक्षा कमी केली आहे. यात अनेकांवरील दोष सिद्ध झालेले आहेत, मात्र ट्रम्प यांचे निकटवर्तीय असल्यामुळे मेहेरबानी केल्याचे सांगितले जात आहे. ७१ वर्षांचे पॉल मानाफोर्ट हे अमेरिकेतील लॉबिस्ट व वकील होते. त्यांना २०१८ मध्ये कर चोरीसाठी १२ वर्षांची शिक्षा झाली होती. त्यांची शिक्षा पूर्ण माफ करण्यात आली आहे. ६६ वर्षांचे चार्ल्स कुशनर हे ट्रम्प यांचे व्याही आहेत. त्यांनाही दोन वर्षांची शिक्षा झाली होती. त्यांचीही शिक्षा माफ झाली.
नव्या पक्षाचा विचार
पद सोडल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प नव्या राजकीय पक्षाचा विचार करीत आहेत. पॅट्रियट पार्टी किंवा अमेरिका फर्स्ट असे त्यांच्या पक्षाचे नाव राहू शकते, असा अंदाजही व्यक्त होत आहे.
व्हेनेझुएलाच्या १.४५ लाख प्रवाशांना राजकीय गिफ्ट
ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाच्या १.४५ लाख प्रवाशांना अखेरचे राजकीय गिफ्ट दिले आहे. या साऱ्यांना त्यांच्या देशात परत पाठविण्यात येणार होते. मात्र ट्रम्प यांनी मंगळवारी रात्री एक स्वाक्षरी करून यांचे निर्वासन १८ महिन्यांसाठी स्थगित केले आहे.
युद्धाशिवाय कारकिर्द
कार्यकाळ संपल्यानंतर ट्रम्प यांनी एका व्हिडीयोच्या माध्यमातून जनतेला संबोधित केले. यात त्यांनी आपल्या कारकिर्दीत एकही युद्ध होऊ दिले नाही, ही बाब अभिमानाने सांगितली. तसेच आपल्या सरकारच्या कारकिर्दीतील चांगल्या घटना आणि निर्णयांचा पाढाच त्यांनी वाचला.