जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त विशेष
मातेच्या दुधात दहा लाखांपेक्षा जास्त पांढऱ्या पेशी तयार करण्याची क्षमता आहे. बाळाचे प्रथम लसीकरण म्हणजे चिक दूधाचे सेवन. याबाबत फारशी जनजागृती झालेली नाही. त्यामुळे मातेच्या दुधाचे महत्त्व आपण जाणून घ्यायला हवे.
– डॉ. रूपल अग्रवाल
सर्वगुणसंपन्न मानल्या जाणार्या मातेच्या दूधाला बाळाच्या सुदृढतेसाठी अनन्यसाधारण महत्व आहे. मातेचे दूध पिणारी मुले कमी आजारी पडतात. शिवाय त्यांचे पोषण चांगल्या प्रमाणात होते. हे देखील सप्रमाण सिध्द झाले आहे. मातेच्या दुधात दहा लाखांपेक्षा जास्त पांढर्या पेशी तयार करण्याची क्षमता असून बाळाचे पहिले लसीकरण म्हणजे चिक दूधाचे सेवन होय. माणसाची निसर्गाशी जोडली गेलल्या घट्ट नाळेचे सुंदर उदाहरण म्हणजे स्तनपान हे ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ डेव्हिड सुझीकी यांनी मांडलेले प्रमेय शाश्वत ठरले आहे.
१ ते ७ ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात येणार्या जागतिक स्तनपान सप्ताह साजरा केला जातो. सामान्य प्रकृती असलेल्यां बाळाला जन्मानंतर तीस मिनिटे ते एक तासाच्या आत आईच्या पोट किंवा छातीवर ठेवावे. बाळ लगेच आईच्या दूधाच्या सुगंधामुळे निप्पल शोधत ब्रेस्टकडे वळते, याला ब्रेस्ट कॉल म्हणतात आणि बाळाला स्तनपान करण्याची संधी मिळते. स्तनपान जेवढ्या लवकर सुरू होईल, तेवढ्या लवकर आई आणि बाळामध्ये भावनिक बंध निर्माण होतात. स्तनपान पूर्ण झाल्यावर बाळाला ढेकर देण्यास मदत करावी. कारण सगळी बाळे स्तनपान करताना हवादेखील पोटात घेतात. बाळांना ही हवा सोडण्यासाठी मदत करावी. अन्यथा ही हवा आतड्यांपर्यंत पोहचली तर बाळ अस्वस्थ होऊ शकते.
आईच्या स्तनाच्या एका बाजूला दूध आणि दुसर्या बाजूला पाणी येते, हा पूर्णपणे गैरसमज आहे. स्तनपान करताना प्रारंभी जे दूध (फोर मिल्क) येते, ते पातळ असते. त्यामुळे बाळाची तहान भागते. त्यानंतर जे दूध ( हाईंड मिल्क) येते, त्यामुळे बाळाची भूक भागते. स्तनपानास सुरूवात केल्यानंतर अनेकदा दुसर्या स्तनातूनही दूध झरू लागते. तेव्हा बाळाला दुसर्या स्तनास लावण्याचा सल्ला दिला जातो. असे कधीही करू नका अन्यथा बाळाला दोन्हीकडून नुसतेच फोर मिल्क मिळून त्याचे संपूर्ण पोषण होणार नाही.
बाळाला दूध पुरते आहे की नाही हे कसे ओळखावे? असा प्रश्न अनेक जण विचारतात. बहुतांश आईला तसे वाटत असते. पण जर स्तनपान घेणारे बाळ दिवसातून ६ ते ८ वेळा व्यवस्थित लघवी करीत असेल आणि त्याचे वजन व्यवस्थित चार्टप्रमाणे वाढत असेल तर त्याला तुमचे दूध पुरते आहे, असे समजावे.
आपल्या समाजात सर्व गोष्टींचा बेगडी दिखावा करण्याची जी प्रथा आहे, ती उबग आणणारी आहे. बाळंतपण सोसलेल्या आईला व्यवस्थित दूध येण्यासाठी पुरेशा विश्रांतीची गरज असते. पण बाळ जन्मल्यानंतर लगेचच जवळचे, दूरचे नातेवाईक दवाखान्यात गर्दी करतात, जे अयोग्य आहे. अनेक नवजात बालके रात्री जागतात आणि दिवसा झोपतात. त्यामुळे आईला रात्रीचे जागावे लागते. रात्रीच्या जागरणानंतर बाळ तर दिवसा आपली झोप पूर्ण करते. परंतु सतत येणार्या पाहुण्यांमुळे आईच्या झोपेचा खोळंबा होतो. अपुर्या झोपेनंतरही मानसिक व शारिरीकदृष्ट्या थकलेली आई उसने हास्य आणून मुकाट्याने सारे सहन करते. त्यामुळेही तिच्या दूधावर परिणाम होतो. त्यामुळे या गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष देणे गरजेचे आहे.
स्तनपानाची प्रक्रिया ही अनेक शंका आणि प्रश्न यांनी भरलेली असते. मातेला ताप आल्यास बाळाला पाजायचे का? आईला दूध येत असेल तर काय करावे? हे आणि असे असंख्य प्रश्न सर्वांना सतावत असतात. असे प्रश्न, शंका, भीती यांचे निरसन करणारे, सहाय्यभूत ठरणारे स्तनपान तज्ञ सर्वत्र उपलब्ध आहेत. अशा स्तनपान तज्ञांची मदत घेऊन आई आणि बाळाच्या सुदृढ आयुष्याची काळजी वाहणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आईचे दूध नक्कीच बाळाला द्यायला हवे.
(स्तनपान विशेषज्ञ, स्माईल डेंटल क्लिनिक, कॉलेजरोड. मो. ८३९०४७४४९३)