राज्याच्या जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांचे कामकाज 1 ऑगस्ट 2020 पासून संपूर्णत : ऑनलाईन पध्दतीने सूरु झालेले आहे. जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी साठी ऑनलाईन अर्ज कसा भरावा ? त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ? प्रमाणपत्र कसे प्राप्त होईल् ? समित्यांच्या ऑनलाईन कामकाजाबाबत आपणास पडलेल्या वरील प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न या लेखात करण्यात आला आहे.
शैक्षणिक वर्ष 2021-2022 मध्ये इयत्ता 12 वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या व व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अद्यापपर्यंत त्यांचे अर्ज जात वैधता प्रमाणपत्र पड़ताळणी समितीकडे सादर केलेले नाहीत. त्यांनी https://bartievalidity. maharashtra.gov.in या वेबसाईटवरुन ऑनलाईन अर्ज भरावा व मूळ कागदपत्रांसह (Hard Copy) संबंधित जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नागरी सुविधा केंद्र येथे 15 दिवसात सादर करावा व प्रवेशावेळी आपली ऐनवेळी होणारी धावपळ टाळावी.
https://bartievalidity. maharashtra.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन फॉर्म/अर्ज भरतांना अर्जदाराने खालीलप्रमाणे मुळ कागदपत्रे/पुरावे स्कॅन करुन अपलोड झालेले आहेत किंवा नाही, याची स्वतः खात्री करुनच फॉर्म/अर्ज सबमिट करावा व स्वत:च्याच मोबाईल नंबर व E-mail द्यावा. 1) अर्जदाराने लॉगिन करतेवेळी स्वतःचा ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक असावा. 2) अर्जदाराचे मुळ जात प्रमाणपत्र. 3) नमुना नं.3 शपथपत्र (वंशावळीचे) 4) A. शपथपत्र नमुना नं.17 (शैक्षणिक प्रयोजनासाठी) B. शपथपत्र नमुना नं.19 (नोकरी विषयक प्रयोजनासाठी) C. शपथपत्र नमुना नं.21 (निवडणूक प्रयोजनासाठी) D. शपथपत्र नमुना नं.23 (इतर प्रयोजनासाठी.) 5) A. शैक्षणिक फॉर्म न.15a :- या फॉर्मवर संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य यांची स्वाक्षरी व गोल शिक्का (सिल) आवश्यक आहे. B. नोकरी फॉर्म न.15a :- या फॉर्मवर नियुक्ती प्राधिकारी यांचीच स्वाक्षरी व गोल शिक्का असणे आवश्यक आहे. C. निवडणूक फॉर्म न.15a :- या फॉर्मवर निवडणूक निर्णय अधिकारी यांचीच स्वाक्षरी व गोल शिक्का असणे आवश्यक आहे. D. इतर- फॉर्म न.15a. :- या फॉर्मवर ज्या आस्थापनेकडून/संस्थेकडून लाभ मिळणार आहे, तेथील प्रमुख यांचीच स्वाक्षरी व गोल शिक्का असणे आवश्यक आहे. 6) अर्जदाराचा फोटो व स्वाक्षरी. वरील 1 ते 6 मुद्दे जात वैधता प्रमाणपत्र मिळविणेकरीता आवश्यक आहेत. 7) अर्जदाराचा शाळेचा दाखला/प्रवेश निर्गम उतारा/जनरल रजिष्ट्रर उतारा. 8) अर्जदाराच्या वडीलांचा शाळेचा दाखला./प्रवेश निर्गम उतारा/जनरल रजिष्टर उतारा. 9) अर्जदाराचा आजोबांचा शाळेचा दाखला/गांव नमुना नं. 14 (जन्म/मृत्यू नोंद) 10) अर्जदाराचे पंजोबा व खा.पंजोबा यांचे उपलब्ध असल्यास शाळेचा दाखला/गांव नमुना नं.14. 12) 6 ड उतारा, हक्काचे पत्रक, वारस नोंदी, कडई पत्रक, फेरफार पत्रक, व्यवसाय पुरावा इ. 11) अर्जदाराचे चुलते, आत्या यांचे शालेय/महसूली पुरावे. 13) रक्त नातेसंबंधातील व्यक्तीचे जात वैधता प्रमाणपत्र.
मुद्दा क्र.6 ते 13 मधील सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती सुस्पष्ट व सक्षम प्राधिकाऱ्याकडून साक्षांकित केलेल्या असाव्यात. तसेच वरील सर्व बाबी जात दावा सिध्द करणेकरीता आवश्यकआहेत. तसेच वरील सर्व पुराव्यांच्या मूळ प्रमाणित प्रती स्कॅन करुन अपलोड करणे आवश्यक आहे. जेणेकरुन अर्जदाराच्या प्रकरणात त्रुटी लागणार नाही, याची काळजी घ्यावी, जुना पुरावा मानीव दिनांक पूर्वीचा असणे ‘अत्यंत महत्वाचे आहे
मानीव दिनांक याचा अर्थ,
1) अनुसूचित जाती (SC) या प्रवर्गातील जातीदावा सिध्द करणेसाठी दि.10 ऑगस्ट, 1950 पुर्वीचा सख्या रक्तनातेसंबंधातील शालेय अथवा महसूली पुरावा आवश्यक आहे. 2) विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT) या प्रवर्गातील जातीदावा सिध्द करणेसाठी दि.21नोव्हेंबर, 1961 पूर्वीचा सख्या रक्तनातेसंबंधातील शालेय अथवा महसूली पुरावा आवश्यक आहे. 3) इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (OBC/SBC/SEBC) या प्रवर्गातील जातीदावा सिध्द करणेसाठी दि. 13 ऑक्टोबर, 1957 पुर्वीचा सख्या रक्तनातेसंबंधातील शालेय अथवा महसूली पुरावा आवश्यक आहे.
तयार झालेले वैधता प्रमाणपत्र हे ई स्वाक्षरीचे (डिजिटल) असल्याने त्याची मुळ प्रत कार्यालयाकडून मिळत नाही. तसेच तयार झालेले वैधता प्रमाणपत्र है अर्जदाराने फॉर्म/अर्ज भरतांना दिलेल्या ई-मेल आयडीवरच पाठविण्यात येते. त्यामुळे अर्जदाराने प्रत्यक्ष जात वैधता प्रमाणपत्र घेणेसाठी कार्यालयात येणेची गरज नाही. जेव्हा नोटीस काढून sms, E-mail दवारे सूनावणी अथवा त्रुटी पुर्ततेसाठी बोलावले जाईल तेव्हाच यावे. जात वैधता प्रमाणपत्राअभावी मागसवर्गीय विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये यासाठी विद्यार्थ्यांनी परिपूर्ण अर्ज विहित वेळेत समितीकडे सादर करावा व ज्या प्रकरणामध्ये समितीकडून अर्जदारास ई-मेल वर त्रुटी कळविण्यात आलेल्या आहेत. त्यांनी त्रुटीची पुर्तता ऑनलाईन कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावे. तसेच याबाबत काही तांत्रिक व इतर अडचण आल्यास ईमेल helpdesk@barti.in व टोल फ्री हेल्पलाईन क्र.. 18002330444 वर संपर्क साधावा.
….