नाशिक- आज होणाऱ्या जागतिक बुद्धिबळ ऑलिंपियाड स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताचा प्रतिस्पर्धी संघ आता कोण असेल ? हे आता निश्चित झाले असून विजेतेपद मिळविण्यासाठी अंतिम लढतीत रशियासारख्या बलाढ्य संघाचे आव्हान भारतीय संघाला पार पाडावे लागणार आहे. काल झालेल्या दुसऱ्या उंपात्य लढतीत राञी उशिरा रशियन संघाने अमेरिकन संघाचा पराभव करुन स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे.
रशियन संघात बलाढ्य खेळाडूंचा समावेश असला तरी या स्पर्धेत आत्तापावेतो भारतीय खेळाडूंनी सातत्याने दमदार प्रदर्शन केलेले असल्याने रशियन संघाला रोखून या स्पर्धेच्या इतिहासातले पहीले विजेतेपद खेचून आणण्यात भारतीय संघ यशस्वी होईल का, याबाबतचे चित्र आज संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल.
जागतिक बुद्धिबळ ऑलिंपियाड स्पर्धेच्या इतिहासात भारतीय बुद्धिबळ संघ प्रथमच अंतिम फेरीत पोहोचला असून नाशिक शहरासाठी अभिमानाची बाब म्हणजे आॕनलाईन खेळल्या गेलेल्या या स्पर्धेच्या नेतृत्वपदाची सगळी सुत्र ग्रॕडमास्टर विदीत गुजराथी नाशिकमधूनच पुढे नेतो आहे.
दर दोन वर्षांनी होणारी ही स्पर्धा यंदा कोरोना प्रादुर्भावामुळे ऑनलाइन पद्धतीने खेळविण्यात येत आहे. विश्वनाथन आनंद, पी. हरीहरन आणि कोनेरू हम्पी यासारख्या दिग्गज बुद्धिबळपटूंचा समावेश असलेल्या भारतीय संघाचे नेतृत्व नाशिकच्या विदित गुजराथी या दमदार खेळाडूकडे सोपविण्यात आलेले आहे. विदीत सध्या त्याच्या नाशिक मधील निवासस्थानातून ही आॕनलाईन स्पर्धा खेळत असून कुठल्या खेळाडूने कोणती फेरी खेळायची ? कोणते डावपेच आखायचे ? यासारखे निर्णय विदीत या नामवंत खेळाडूंबरोबर आॕनलाईन चर्चा करुन घेतो आहे.
एकूण १६३ देशांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत शनिवारी भारतीय संघाने उंपात्य फेरीत पोलंड सघांचा रोमहर्षक सामन्यात पराभव करुन या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. रशिया विरुध्द अमेरिका या दोन बलाढ्य संघांमध्ये दुस-या उपांत्य सामन्यात रशियाने बाजी मारली आहे.
२०१४ साली भारतीय संघाला या स्पर्धेत कास्य पदक प्राप्त झाले होते त्यामुळे या स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळण्याची संधी भारतीय संघाला प्रथमच मिळत असून नाशिकचे नाव या निमीत्ताने भारतीय बुध्दीबळाच्या इतिहासात नोंदविले जाईल हे नक्की.
ज्यावेळी ही स्पर्धा सुरू झाली त्यावेळी फिडे या जागतिक बुद्धिबळ संघटनेतर्फे प्रसिध्द करण्यात आलेल्या क्रमवारीत भारताचा ७ वा क्रमांक होता. परंतु आता ही स्पर्धा अंतिम टप्प्यात आलेली असताना भारतीय संघाला थेट सुवर्णपदक जिंकण्याची संधी निर्माण झाली आहे आणि ती संधी नाशिककरांसाठी निश्चितच अभिमानास्पद म्हणावी लागेल.
रविवारी होत असलेल्या अंतिम सामन्याकडे सर्व बुद्धीबळ चाहत्यांचे लक्ष लागून राहीले आहे.