पृथ्वीचे कवचकुंडल – ओझोन
– मुकुंद बाविस्कर
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)
संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण परिषदेच्या वतीने दि. 16 सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक ओझोन संवर्धन दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. ओझोनचा थर नष्ट होत असल्याने वनस्पती आणि प्राणीसृष्टीवर किंबहुना संपूर्ण जीवसृष्टीवर मोठे संकट उभे ठाकले आहे. ओझोनचा थर नष्ट करण्यास कारणीभूत ठरणाऱ्या घातक रसायनांचा वापर टाळला टाळायला हवा. यासाठी सर्व व्यक्ती, समाज, देश आणि सर्व आंतरराष्ट्रीय संस्था संघटना यांनी एकत्र प्रयत्न करण्याची गरज आहे…
‘नोबेल पुरस्कार’ हा जगातील एक मानाचा पुरस्कार मानला जातो. दरवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रातील संशोधनाबद्दल शास्त्रज्ञांना या पुरस्काराने गौरवण्यात येते. इ. स. 1995 मध्ये देखील 3 रसायनशास्त्रज्ञांना नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले आणि जगभरात एकच खळबळ उडाली, तसेच चिंता निर्माण झाली. परंतु या शास्त्रज्ञांना पुरस्कार मिळाला म्हणून चिंता निर्माण झाली नाही, तर त्यांनी लावलेल्या संशोधनामुळे जगभरातील अभ्यासकांचे डोळे खाडकन उघडले. काय होता त्यांच्या संशोधनाचा विषय…? त्यांच्या संशोधनाचा विषय होता, वातावरणातील ओझोनचा नष्ट होणारा थर आणि त्याचे दुष्परिणाम. वास्तविक ओझोन हा शब्द आणि पर्यावरणावरील दुष्परिणाम याबद्दल जास्त चर्चा सुरू झाली ती इ. स. 1980 पासून. परंतु त्याबद्दल गांभीर्याने विचार करण्यासाठी आणि उपाय योजनांबद्दल जगभरात आवाज उठविण्यात येऊ लागला तो इ. स. 1995 नंतर, असे म्हटले जाते. कारण याच वर्षी प्रा. पॉल क्रूटझन, प्रा. शेरवुड रोलँ आणि मारिओ जे मोलीना या तीन शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या कारणांनी ओझोनचा थर नष्ट होत असल्याचे दाखवून दिले. या पायाभूत संशोधनाबद्दल या रसायन शास्त्रज्ञांना नोबेल पारितोषिक मिळाले. वास्तविक पाहता 1970 मध्ये प्रा. पॉल क्रूटझन यांनी सर्वप्रथम स्पष्ट केले की, रासायनिक खतांचा अनिर्बंध वापर तसेच सुपरसॉनिक (आवाजापेक्षा जास्त गतिमान) विमानांमुळे वातावरणात सोडल्या जाणाऱ्या नायट्रोजन ऑक्साईडचा परिणाम होऊन वातावरणातील ओझोन नष्ट होतो. तसेच 1974 मध्ये प्रा. शेरवुड रोलँ आणि मारिओ जे. मोलीना यांनी संशोधनातून सिद्ध केले की, क्लोरोफ्लोरो कार्बनच्या विघटनातून निर्माण होणाऱ्या क्लोरीनमुळे ओझोनचा थर नष्ट होऊ शकतो. याच कालखंडात फर्माण नावाचा एक ब्रिटिश शास्त्रज्ञ अंटार्टिकावरील ओझोनचा विवराचे मोजमाप घेत असताना पृथ्वीभोवतीच्या ओझोनचा क्षय होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्याचा परिणाम प्रामुख्याने अंटार्टिकावरील ओझोन विवरावर होतो आणि दरवर्षी हे विवर वाढत असल्याचे त्यांनी ठामपणे मांडण्यास सुरुवात केली. तसेच युरोपात ठिकठिकाणी व्याख्याने देण्यास सुरुवात केली.
● ओझोन म्हणजे काय? :
ओझोन (O3) हा ऑक्सिजनचे एक रूप आहे. ‘ओझोन’ हा मूळ शब्द ग्रीक भाषेतील असून त्याचा अर्थ ‘हुंगणे’ असा होतो. या वायूला 1840 मध्ये शोनबीन या शास्त्रज्ञाने ‘ओझोन वायू’ असे नाव दिले. साधारणतः हवेत ओझोनचे प्रमाण खूप कमी (म्हणजे 0.02 ते 0.07 पीपीएम) असते, पीपीएम म्हणजे दशलक्ष कणांपैकी एक कण. परंतु जसेजसे आपण पृथ्वीपासून वर जाऊ तसे ओझोनचे प्रमाण वाढत जाते. ओझोन हा निळसर, स्फोटक वायू असून त्याचे प्रमाण कमी होत असल्याने केवळ मानवी जीवनाला नव्हे तर पृथ्वीवरील सकल जीवसृष्टीला धोका निर्माण होत आहे. वातावरणातील सूर्याची अतिनील किरणे ऑक्सिजनबरोबर अभिक्रिया करून ओझोन तयार होतो. वातावरणातील ऑक्सिजन आणि ओझोनमध्ये एक प्रकारचे संतुलन कायम असते. वातावरणातील सर्व वायूंच्या वरच्या स्तरावर विशिष्ट उंचीवर ओझोन स्थिर असतो, त्यालाच ‘ओझोनचा थर’ असे म्हटले जाते. हा थर सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणांपासून आपले संरक्षण करतो, म्हणजेच या किरणांना शोषून अनेक प्रकारे टीपकागदाचे काम करतो. वातावरणातील ओझोनचे प्रमाण कमी होणे ही सध्याच्या काळातील अत्यंत चिंतेची गोष्ट बनली आहे. ओझोनचा थर हा आपल्यासाठी सुरक्षाकवच आहे, परंतु हळूहळू ओझोन थराची घनता कमी होत चालली आहे.
● ओझोनचा थर कमी होण्याची कारणे :
ओझोनचा उपयोग प्रामुख्याने पाणी स्वच्छ करणे, कापडाचे आणि तेलाचे उत्पादन करणाऱ्या कारखान्यात होतो. ओझोनच्या थरातील घनता कमी होत असल्याने सूर्याची अतिनील किरणे सरळ जमिनीवर पोहोचण्याची भिती वाढली आहे. ओझोनच्या थरातील घनता कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे क्लोरोफ्लोरो कार्बन (सीएफसी) हा रासायनिक समूह. यातील क्लोरीन वायू हा ओझोन नष्ट करणारा आहे. या क्लोरोफ्लोरो कार्बनचा उपयोग शितकरणासाठी अमोनियाबरोबर होतो. या रसायनाचा वापर हा फ्रिज (रेफ्रिजरेटर), वातानुकूलित यंत्रे, इन्सुलेटर्स, कॉम्प्युटर्स आणि इलेक्ट्रॉनिक यंत्रणा यामध्ये होतो.
● ओझोन थराचा उपयोग:
ओझोन थराचा अनेक प्रकारे उपयोग होतो. सूर्यापासून निघणार्या अतिनील बीटा किरणोत्सर्गाला पूर्णतः शोषून घेण्याचे काम हा थर करतो. त्यासोबतच किरणोत्सर्गदेखील शोषला जातो. हे घातक किरणोत्सर्ग जमिनीवर पोहोचल्यास मानवी आरोग्यावर दुष्परिणाम करू शकतात. त्यामुळे त्वचारोग, कर्करोग, मोतीबिंदू वाढणे, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे आदी आजार उद्भवतात. तद्वतच अन्य प्राणी आणि वनस्पतींवर देखील त्याचा विपरीत परिणाम होतो. अन्नधान्याच्या उत्पादनात घट होते. विशेषतः सागरी जीवांवर परिणाम होऊन माशांचे उत्पादनही घटते. ओझोन थर कमी करण्यास कारणीभूत ठरणाऱ्या रासायनिक पदार्थांचा वापर कटाक्षाने टाळण्याची गरज आज निर्माण झाली आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण परिषदेच्या वतीने दि. 16 सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक ओझोन संवर्धन दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. ओझोनचा थर नष्ट होत असल्याने वनस्पती आणि प्राणीसृष्टीवर किंबहुना संपूर्ण जीवसृष्टीवर मोठे संकट उभे ठाकले आहे. ओझोनचा थर नष्ट करण्यास कारणीभूत ठरणाऱ्या घातक रसायनांचा वापर टाळला टाळायला हवा. यासाठी सर्व व्यक्ती, समाज, देश आणि सर्व आंतरराष्ट्रीय संस्था संघटना यांनी एकत्र प्रयत्न करण्याची गरज आहे.
● ओझोन संवर्धन उपाययोजनांमधील महत्त्वाचे टप्पे :
◆ 1930 : पृथ्वीभोवती ओझोनचे आवरण असल्याचे जगभरात मान्य.
◆ 1934 : पृथ्वीच्या संरक्षणासाठी ओझोन उपयुक्त असल्याच्या निष्कर्षाला अनेक शास्त्रज्ञांचा दुजोरा.
◆ 1970 : रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे ओझोनला धोका असल्याचा शास्त्रज्ञांचा दावा.
◆ 1974 : ओझोनच्या थराचा क्षय होत असल्याचा संशोधकांचा निष्कर्ष.
◆ 1980 : ओझोनच्या थराचे मोजमाप करण्यास सुरुवात.
◆ 1984 : ओझोन थराचा क्षय होत असल्याचे अमेरिकेच्या नॅशनल सायन्स अकॅडमीकडून मान्य.
◆ 1985 : अमेरिकेत ‘सायन्स डायजेस्ट’ मासिकात ओझोन समस्या संबंधी अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर अमेरिकेने पर्यावरण संरक्षण समिती नेमली.
◆ 1990 : ओझोन विवर झपाट्याने वाढत असल्याचे जगभरातील शास्त्रज्ञांच्या निदर्शनास आले.
◆ 1993 : दक्षिण ध्रुवावर ओझोनचा थर नेहमीपेक्षा २५ टक्केच शिल्लक असल्याने मोठी खळबळ.
◆ 1995 : ओझोन विवर समस्येवर उपाय योजनेसाठी जगभरात आंतरराष्ट्रीय परिषदा भरविण्यास सुरुवात.
◆ 2000 मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत पाच वर्षात सीएफसी (क्लोरोफ्ल्युरो कार्बन) वर बंदी घालण्यावर एकमत, अनेक राष्ट्रांच्या करारावर सह्या.
◆ 2010 साल हे जगभरात सीएफसींचे उत्पादन पूर्णपणे थांबवण्यासाठीचे शेवटचे वर्ष होते.
◆ 2030 पर्यंत सीएफसीला पर्याय असणाऱ्या रसायनांचा वापर बंद होणार.
◆ 2050 पर्यंत ओझोनचा थर पूर्ववत होईल, असा विश्वास शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.
(लेखकाशी संपर्क : मोबाईल – 9404786784 ई मेल – baviskarmukund02@gmail.com)