कोणाला विस्मरण झाले म्हणून हसू नका अन् रागवूही नका
– मुकुंद बाविस्कर
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)
लॉकडाऊनच्या काळात काही महिन्यापूर्वी वाचनात आलेली ही एक घटना. सुमारे ७५ वर्षांचे एक आजोबा घरातून बाहेर पडले आणि लांब अज्ञात स्थळी आल्यावर घराचा पत्ताच विसरले. रस्त्यात जाणाऱ्या येणाऱ्याला ते मला माझ्या घरी सोडा, असे म्हणत होते. लोकांनी त्यांना पोलीस ठाण्यात सोडले. पण आपण नेमके कोठे राहतो? गल्ली, कॉलनी, गाव याबाबत त्यांना काहीच आठवत नव्हते. एक तर त्यांच्याकडे कोणताही पुरावा नव्हता, सामान नव्हते, मोबाईल देखील नव्हता, खिशात कोणताही कागद नव्हता. मग ते नेमके कुठे राहणारे आहेत ते पोलीस तरी कसे ओळखणार?
मनुष्याचे जसे वय वाढत जाते तसतसे मेंदूच्या ऱ्हासाची प्रक्रिया सुरू होते. मेंदूच्या आकारात बदल होऊन त्याचे वजन कमी होऊ लागते. सर्वसामान्यपणे काही लोकांमध्ये बौद्धिक क्षमता चांगली असल्यास मेंदूचा त्रास झाल्याचे निदर्शनास येत नाही. त्यामुळे काही ज्येष्ठ नागरिकांची स्मरणशक्ती शेवटपर्यंत चांगली असल्याचे आपणास दिसून येते. याउलट काही ज्येष्ठ नागरिकांच्या मेंदूच्या पेशींमध्ये लक्षणीय हानी झाली तर बौद्धिक क्षमतेत घट होते. साधारणतः ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींमध्ये अशी लक्षणे दिसून येतात.
२१ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक अल्झायमर दिन’ म्हणून पाळण्यात येतो. अल्झायमर याचा अर्थ स्मृतीभ्रंश किंवा बौद्धिक क्षमतांचा ऱ्हास होय. इ. स. १९०६ मध्ये जर्मन वैद्यकीय शास्त्रज्ञ डॉ. अॅलॉईस अल्झायमर यांनी सर्वप्रथम आजारावर सखोल संशोधन केले, म्हणून त्यांच्या स्मरणार्थ या आजाराला असे नाव देण्यात आले आहे. वास्तविक त्यापूर्वी सुमारे शंभर वर्ष आधी या आजारावर संशोधन सुरू झाले होते. आधुनिक मानसशास्त्राचे प्रणेते डॉ. फिलिप यांनी या आजाराकरिता इ.स. १७९७ मध्ये सर्वप्रथम डिमोन्शिया हा शब्द उपयोगात आणला. डिमोन्शिया म्हणजे केवळ विस्मरण नव्हे तर बौद्धिक क्षमतांचा ऱ्हास होय.
बौद्धिक क्षमता ही तशी विस्तृत
संकल्पना आहे. यात स्मरणशक्ती, वेगळ्या समस्या सोडविणे, वेगवेगळ्या अंकांचे गणित करणे, श्रवण आणि वाचन यांचे विश्लेषण करणे, स्मरणशक्तीचा विकास, अध्ययनात लक्ष देणे, मनाची एकाग्रता ठेवणे, भाषा आणि अभिव्यक्तीची जाणिव येणे, स्थळ आणि काळाचे भान असणे असे अनेक बौद्धिक क्षमतेचे घटक यात समाविष्ट असतात. या सर्व क्षमतांची मोजमाप करण्याची आणि चाचण्याची पद्धत मानसोपचार तज्ज्ञाकडे उपलब्ध असते. बौद्धिक क्षमतेचा विकास आणि ऱ्हास नेमका कशामुळे होतो याची अनेक कारणे सांगण्यात येतात. तरी विस्मरण किंवा स्मृतीभ्रंश नेमका कशामुळे होतो, याची ठोस कारणे मिळू शकत नाहीत. थायरॉईड ग्रंथीचे काही आजार, उच्चरक्तदाबामुळे मेंदूत अंतर्गत झालेला रक्तस्त्राव, मेंदूजलात वाढलेला दाब, शरीरातील काही महत्त्वाच्या पेशीमध्ये बिघाड, बालपणापासून कुपोषण किंवा तरुणपणी पौष्टिक अन्न मिळवण्याचा अभाव, अती मद्यपानाची सवय तसेच वेगवेगळ्या आजारांवर वारंवार औषधांचे सेवन व खाद्यपदार्थांमधून विषारी रासायनिक घटक शरीरात जाणे, अशा अनेक कारणांमुळे मेंदूच्या पेशींमध्ये कार्य बिघडते, त्यातून बौद्धिक क्षमतेचा र्हास होऊ शकतो, असे आरोग्य शास्त्रज्ञ सांगतात.
विस्मरणाच्या या आजारात प्रामुख्याने तीन प्रकारची लक्षणे आढळून येतात, पहिले लक्षण म्हणजे सदर रुग्ण हा दैनंदिन जीवनातील दात घासणे, आंघोळ करणे, कपडे घालणे, जेवण करणे अशा साध्या क्रिया देखील विसरतो किंवा त्या क्रिया पुन्हा-पुन्हा करत रहातो. दुसरे लक्षण म्हणजे रुग्ण हा स्वतःच्या नातेवाईकांवर संशय येऊ लागतो तसेच त्यांची ओळख विसरतो आणि तिसरा प्रकार म्हणजे रात्रीच्या वेळी अस्वस्थपणे येरझारा मारत राहतो किंवा स्वतःशीच बडबडत करतो. सदर आजार हा वृद्ध व्यक्तीप्रमाणेच काही वेळा अन्य वयोगटातील व्यक्तीला देखील होऊ शकतो, असे संशोधकांचे म्हणणे आहे.
काही विषाणूंचा संसर्ग, अॅल्युमिनियमची विषबाधा, वेदनाशामक औषधांचा अतिवापर, बी आणि ई जीवनसत्वाचा अभाव यामुळे देखील सदर आजार बळावू शकतो. सदर रुग्णांचा सांभाळ करताना नातेवाईकांपुढे अनेक समस्या निर्माण होतात. मात्र या आजाराबाबत आता मोठ्या प्रमाणावर जाणीव जागृती होत असल्याने समाजाचा या रुग्णांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका अहवालानुसार जगभरात सुमारे दोन कोटी लोक बौद्धिक क्षमतेच्या त्रासामुळे आजारी असल्याचे नमूद केले आहे. अमेरिकेची लोकसंख्या सुमारे ३३ कोटी असून त्यातील दिड टक्के लोकांना हा आजार आहे. आरोग्यतज्ज्ञ्यांच्या मतानुसार, इ. स. २०५० पर्यंत जगात १५ कोटी लोकांना स्मृतिभ्रंश होईल होईल, असे सांगण्यात येते. जागतिक आरोग्य संघटनेने या आजारासंबंधी अधिक संशोधन करण्याचे आवाहन शास्त्रज्ञांना केले आहे. त्यामुळे कोणाला विस्मरण झाले म्हणून हसू नका अन् रागवूही नका. इतकेच सांगावेसे वाटते.
(लेखकाशी संपर्क : मोबाईल – 9404786784 ई मेल – baviskarmukund02@gmail.com)