जळगाव – जळगाव महानगरपालिकेत महापौर व उपमहापौर पदासाठी ऑनलाईन पध्दतीने मतदान संपन्न झाले. या निवडणुकीत महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री सुनील महाजन यांची निवड झाली. तर भाजपच्या उमेदवार प्रतिभा कापसे यांचा पराभव झाला. महाजन यांना ४५ तर भाजपच्या कापसे यांना ३० मते मिळाले असून लवकरच अधिकृत घोषण करण्यात येणार आहे.
भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या या महानगरपालिकेत २७ नगरसेवकांनी बंड केल्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या महानगरपालिकेत भाजपचे ५७ नगरसेवक होते. पण, २७ नगरसेवकांनी बंड केल्यामुळे त्यांचे बहुमत घटले. शिवसेनेकडे १५ संख्याबळ आहे. त्यांना एमआयएमच्या तीन नगरसेवकांनी पाठींबा दिला. त्यात भाजपच्या बंडखोर नगरसेवकांनी मतदान केले. त्यामुळे त्यांचे संख्याबळ ४५ पर्यंत गेले.
या निवडणुकीची प्रक्रिया सुरु होण्याअगोदरच भाजपच्या नगरसेविका अॅड. सुचिता हाडा यांनी उमेदवारीबाबत आक्षेप घेतला होता. पण, पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आक्षेप फेटाळून लावले. महापौरपदासाठी शिवसेनेचे जयश्री महाजन तर भाजपतर्फे महापौर पदासाठी प्रतिभा कापसे यांचे अर्ज वैध ठरवले. या निवडणुकीत भाजप नेते गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री एकनाथ खडसे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यात महाजन यांना मोठा धक्का बसला.
निकालाआधीच बॅनर
मनपाच्या मुख्यव्दाराजवळच निकालाआधी शिवसेना कार्यकर्ते विराज कावडिया यांनी जयश्री महाजन व कुलभूषण पाटील यांच्या निवडीचे फलक लावले. त्यामुळे हे फलकही चर्चेत राहिले.