जळगाव – जळगाव महापालिकेच्या गोटात आज दुपारपासून खळबळ उडवून देणारी चर्चा सुरू झाली आहे. सत्ताधारी गटातील साधारण २५ नगरसेवक भुर्रर्रर्र झाल्याची माहिती समोर येत आहे. एवढेच नव्हे तर, या नगरसेवकांना सुरक्षितस्थळी रवाना करण्याची तयारी देखील पुर्ण झाल्याचे कळतेय.
भाजपातील अंतर्गत समजोत्यानुसार महापौर भारतीताई सोनवणे व उपमहापौर सुनील खडके यांचा कार्यकाळ संपल्यानंतर इच्छुकांनी लॉबीक सुरू केली आहे. त्यानुसार नवीन भाजपात महापौर निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. भाजपचे स्पष्ट बहुमत असल्यामुळे भाजपाचा महापौर बनणार असल्याचे निश्चित मानले जात होते परंतु आज अचानक पंचवीस ते तीस नगरसेवक भुर्रर्रर्र झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली. हे नगरसेवक माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या गोटात गेल्याची चर्चा आहे.
दरम्यान या वृत्ताला अधिकृत दुजोरा कोणीही दिला नसला तरी महापालिकेच्या राजकारणात सक्रिय असलेल्या एका व्यक्तीने सोशल मीडियावर नगरसेवक भुर झाल्याची पोस्ट टाकल्यानंतर या चर्चेला अधिकच उधाण आले. दरम्यान आज सायंकाळी माजी मंत्री गिरीश महाजन यासंदर्भात बैठक घेणार होते. परंतु तत्पूर्वीच नगरसेवकांची फुटल्याचे वृत्त आल्यानंतर भाजपाच्या गोटात जबरदस्त चिंतेचे वातावरण पसरले आहे.