जळगाव – जळगाव महापालिकेच्या सत्ताधारी गटातील साधारण २७ नगरसेवक भुर्रर्रर्र झाल्याची माहिती समोर आल्यानंतर त्याचा हादरा नाशिकला बसला आहे. जळगावच्या या घडामोडीमुळे नाशिकच्या भाजप गोटात चिंता वाढू लागली आहे. जळगाव महानगरपालिकेसारखी स्थिती एेन निवडणुकीत नाशिकला भाजपची होऊ नये यासाठी आता वरिष्ठ पातळीवरुन काळजी घेतली जाऊ लागली आहे.
भाजपने राज्यात सत्ता असतांना नाशिक, धुळे व जळगाव महानगरपालिकेत एकहाती सत्ता मिळवली होती. पण, राज्यात सरकार बदलल्यामुळे आता या महानगरपालिकेत सुध्दा नगरसेवकांमध्ये चलबिचल सुरु आहे. नाशिकमध्ये स्थायी समितीत वर्चस्व मिळवल्यानंतर भाजपमध्ये आनंदाचे वातावरण होते. पण, जळगावमध्ये नाराजीनाट्यातून जे घडले तेच नाशिकमध्ये होऊ शकते. त्यामुळे भाजपची चिंता वाढली आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी असलेल्या मनसेमधून अनेक नगरसेवकांनी पक्षांतर केले. या निवडणुकीतही असे काहीसे घडू शकेल असे बोलले जात आहे.
जळगावमध्ये भाजपातील अंतर्गत समजोत्यानुसार महापौर भारतीताई सोनवणे व उपमहापौर सुनील खडके यांचा कार्यकाळ संपल्यानंतर इच्छुकांनी लॉबीक सुरू केली. त्यानुसार नवीन भाजपात महापौर निवडीची प्रक्रिया सुरू झाली. भाजपचे स्पष्ट बहुमत असल्यामुळे भाजपाचा महापौर बनणार असल्याचे निश्चित मानले जात होते परंतु आज अचानक २७ नगरसेवक भुर्रर्रर्र झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली. आता हा आकडा वाढूही शकतो..