दिलीप तिवारी, जळगाव
…..
जळगाव महापालिकेतील सत्तांतरावर उद्या (दि. १८) शिक्कामोर्तब होण्यास आता औपचारिकता बाकी आहे. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने आज आॕनलाईन विशेष सभेला स्थगिती देण्याची याचिका फेटाळली. भाजपचा बचावाचा शेवटचा प्रयत्न निष्पळ ठरला. निवडणूक मैदानात सरदारांचे संख्याबळ भाजपने गमावलेले आहे. फुटीर सदस्य अगोदरच मुंबई बाहेर असल्यामुळे भाजपच्या गटनेत्यांचे व्हिप हे त्यांच्याच खिशात राहिले. त्यामुळे फुटीर नगरसेवकांवर सध्या तरी भाजपचे कोणतेही बंधन नाही. शिवाय, उद्या मतदानानंतर फुटीर नगरसेवकांनी भाजपचा स्वतंत्र गट स्थापन केला तर अपात्रतेच्या संभाव्य कारवाईला फाटे फुटतील. अपात्र होणे हे पक्षांतराला लागू आहे. भाजप अंतर्गत स्थापन स्वतंत्र गटाला नाही. या सर्व घडामोडी भाजपला चारमुंड्या चीत करताना दिसतात …
भाजपचे गटनेते भगत बालाणी व इतर चौघे हे घरकूल घोटाळ्यात शिक्षा झालेले आरोपी आहेत. त्यांना मतदान करायला अपात्र ठरवावे ही याचिकाही जळगाव न्यायालयात आहे. त्यामुळे अपात्र गटनेत्याचा व्हिपही अवैध ठरण्याची शक्यता आहे.
भाजपतून प्रिया जोहरे, सरिता नेरकर, दिलीप पोकळे, रुकसानाबी खान, कांचन सोनवणे, नवनाथ दारकुंडे, गायत्री शिंदे, किशोर बाविस्कर, मिना सपकाळे, दत्तात्रय कोळी, रंजना सपकाळे, प्रविण कोल्हे, चेतन सनकत, सचिन पाटील, प्रतिभा पाटील, प्रतिभा देशमुख, कुलभूषण पाटील, पार्वताबाई भील, सिंधुताई कोल्हे, ललित कोल्हे, रेखा पाटील, सुरेखा सोनवणे, रेशमा काळे, मनोज आहुजा, मिनाक्षी पाटील, सुनील खडके हे २७ नगरसेवक स्वतंत्र गटात बसणार आहेत. याशिवाय एमआयएमचे ३ आणि शिवसेनेचे १५ असे ४५ पाठबळ नगरसेवकांचे नियोजित महापौर जयश्री सुनील महाजन व नियोजित उपमहापौर कुलभूषण पाटील यांना असेल. आॕनलाईन प्रक्रियेत पिठासीन तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत हे प्रत्येक सभासदाला विचारून त्यांचे मत नोंदवून घेतील.
दरम्यान या आॕनलाईन सभेला हरकत घेणारा अर्ज भाजप नगरसेविका रंजना विजय सोनार व विश्वनाथ खडके यांनी खंडपिठात दाखल केला होता. कोवीड संसर्गाचा प्रभाव कमी झाला असून महापौर निवड आॕनलाईन ऐवजी सभागृहात व्हावी अशी मागणी या अर्जात होती. ॲड. अमरजितसिंग गिरासे व ॲड. वाय. बी. बोलकर त्यांच्याकडून होते. न्या. संजय गंगापूरवाला व न्या. श्रीकांत कुळकर्णी यांच्यासमोर याचिका आली. शिवसेनेतर्फे ॲड. ए. आर. सय्यद यांनी बाजू मांडली. सरकारने कोवीड प्रादुर्वाभ रोखण्यासंदर्भात केलेल्या नियोजनात न्यायालय हस्तक्षेप करणार नाही असे सांगून याचिका फेटाळली गेली. अर्थात, भाजपतील फूट आणि नगरसेवकांच्या तक्रारी याचाही लेखाजोखा दिला गेला. सभा आॕनलाईन होणार असल्यामुळे उद्या फुटीर सदस्यांचा कोणताही संबध, संपर्क इतरांशी होणार नाही. म्हणजेच पिठासन अधिकारी यांनी केलेल्या पुकाऱ्यानंतर महापौर व उपमहापौरांना किमान ४५ मते नक्की मिळणार …
भाजपची मुंडी धरणारे प्रशांत नाईक …
औरंगाबाद खंडापिठातील भाजपची मुंडी धरणारे आहेत शिवसेनेचे खंदे सैनिक नगरसेवक प्रशांत नाईक. हा माणूस शिवसेनेचा एवढा पक्का आहे की, एकवेळ सर्व वाघ सोडून जातील पण हा माणूस भगवा धरून बसेलच. भाजपने खंडपिठात याचिका टाकलेली आहे हे रात्री ८ ला समजले आणि हा माणूस औरंगाबादकडे पळाला. हातात एकही कागद नव्हता. प्रवासातील चार तासात जळगावहून व्हाट्स ॲपवर कागद आले. मग रात्री ॲड. सय्यद यांची भेट घेऊन प्रतिवादी होण्याचा अर्ज तयार केला. त्यासाठी सरकारचे आदेशा, कोवीड प्रतिबंधाचे नियम, विशेष सभा नियोजन व भाजप नगरसेवकांच्या तक्रारी असे सर्व दप्तर तयार झाले. त्यामुळे आज न्या. गंगापूरवाला व न्या. कुळकर्णी समोर भापची याचिका आली आणि ती अवघ्या १० मिनिटात निकाली निघाली. शिवसेनेने भाजपला चारमुंड्या चित केले ते अशा सैनिकांमुळेच.
संकट मोचक गिरीश महाजन चमत्कार करतील ही अनेक समर्थकांची अपेक्षा फोल ठरली. आगे आगे आता काय होईल हेच पाहात राहणे मूठभर भाजपच्या हातात आहे …
शिवसेनेचा हा संभावित विजय कार्यकर्त्यांच्या एकजुटीचा आहे. शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, विनायक राऊत, गुलाबराव पाटील, गजानन मालपुरे, नितीन लढ्ढा, सुनील महाजन व कुलभूषण पाटीलसह नऊग्रह मंडळ यांचे परिश्रम वगळता *इतर कोणाताही नेता याचे याचे श्रेय घेऊ लागला तर ‘गेट वेल सून’ अशीच कमेंट करू या …!!!*