जळगाव – आपली पत्नी आणि मुलगा कोरोना पॉझिटिव्ह असतांनाही आपण जिल्हाभर फिरून कोरोनाच्या रूग्णालयात जाऊन रूग्णांना आधार देत आहोत,पण काही लोकप्रतिनिधी आपल्या घरातच थांबून आहेत. ते बाहेर येण्यास तयार नाहीत,असा टोला जळगावचे पालकमंत्री तथा शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी आपल्याच पक्षाच्या एका आमदाराला एका कार्यक्रमात लगावला. त्यांचा हा टोमणा एरंडोलचे आमदार चिमणराव पाटील यांना असल्यामुळे त्यानंतर चर्चाही रंगली.
धरणगाव रस्त्यावर सुरु करण्यात आलेल्या अष्टविनायक कोविड सेंटरचे उद्घाटन पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. नगराध्यक्ष रमेश परदेशी हे अध्यक्षस्थानी होते. शिवसेना नेते पाटील म्हणाले, कोरोना विषाणू साथीच्या काळात सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी,कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी स्वतःचा जीव धोक्यात घालून रूग्णांची मदत करीत आहेत मात्र काही लोकप्रतिनिधी कोरोना विषाणूच्या भितीपोटी घरातच थांबून आहेत, मला स्वतःला रक्तदाब,मधुमेह यासारखे आजार आहेत. माझ्या परिवारातील सदस्य देखील कोरोना पॉझिटिव्ह आहेत तरीही आपण संपुर्ण जिल्ह्यात फिरून कोरोना रूग्णांच्या कायम संपर्कात राहून त्यांच्या अडचणी सोडवित असल्याचे सांगितले.
जे घरात बसून आहेत, त्यांना रूग्णांची अडचण समजू शकत नाही, असा प्रत्यक्ष टोला त्यांनी मतदार संघाच्या लोकप्रतिनिधींना नाव न घेता लगावला. एरंडोल मतदार संघातील शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील हे कोरोना विषाणूंचा संसर्ग सुरु झाल्यापासून घरातच आहेत. ते मतदार संघात फिरले नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांनाच हा टोला लगावल्याची चर्चा कार्यक्रमस्थळी सुरु होती. त्यानंतर तालुक्यातही चर्चा रंगली होती.