जलपाईगुडी (पश्चिम बंगाल) – धुपगुडी येथे रात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण रस्ते अपघातात १४ जण जागीच ठार झाले आहेत. दाट धुक्यामुळे अनेक वाहने आपआपसात धडकली. या अपघातात १० जण जखमी झाले आहेत. पंतप्रधान मोदी यांनी या घटनेचा शोक व्यक्त करत मृतांच्या कुंटुबियांना दोन लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्रीच्या सुमारास बोल्डरने भरलेला दहा चाकी ट्रक राष्ट्रीय महामार्गावरुन जात असताना विरुद्ध दिशने येत असलेल्या दोन वाहनांपैकी एक वाहन ट्रकला धडकले. त्यामुळे ट्रकने दुभाजकाला धडक दिली. त्याचवेळी विरूद्ध बाजूने येणारी दोन वाहने एकमेकांना धडकली. त्यानंतर ट्रक मागच्या मारूती व्हॅनलाही धडकला. सोबतच ट्रकमधील बोल्डर रस्त्यावर व आजूबाजूच्या गाड्यांवर फेकले गेले. त्यामुळे १४ जण जागीच ठार झाले. याप्रकरणी ट्रक चालकास अटक करण्यात आली असून जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे काहींचे प्राण वाचविण्यात यश आले आहे.
धुपगुडी पोलिस स्टेशन परिसरातच ही घटना घडल्याने पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. जखमींना जलपाईगुडीच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. जखमी झालेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. विवाह संमारंभातून घरी परतत असताना हा भीषण अपघात झाला आणि त्यात अनेकांचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात पोलिस अधिक तपास करत आहे.