बर्लिन – जगभरात कोरोनाचा फैलाव वाढत असून जर्मनीतही कोरोनाचा कहर सुरू आहे. त्यामुळेच जर्मन सरकारने २० डिसेंबरपर्यत लॉकडाऊन वाढवला आहे. जर्मनीतील बाधितांची एकूण संख्या २ कोटी ८५ लाख झाली आहे. यातील १५ लाख जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. त्यामुळे जर्मन सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे.
गेल्या काही दिवसांपासून जर्मनीत कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा सुरू झाला आहे. जर्मनीच्या चान्सलर एंजेला मर्केल यांनी संघिय राज्यांमधील मंत्र्यांच्या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले की, जर्मनीच्या नागरिकांना कोरोना विषाणूंपासून मोठ्या प्रमाणात धोका आहे. रुग्ण संख्या देखील झपाट्याने वाढत आहे. यावर उपाययोजना म्हणून २० डिसेंबरपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात येत आहे. त्याच्याबरोबरच जर्मनीत कोरोनासंबंधीच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे.
ख्रिसमसपासून ते नवीन वर्षांच्या दरम्यान म्हणजे २३ डिसेंबर २०२० पासून १ जानेवारी २०२१ पर्यंत १० पेक्षा जास्त जणांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. ख्रिसमसच्या आधी आणि त्यानंतर नवीन वर्षात नागरिकांनी स्वत: ची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच २० डिसेंबर २०२० पर्यंत जर्मनीतील शालेय विद्यार्थ्यांनाही सुट्टी देण्यात आली आहे.