मुंबई – विधानसभेत आणि विधानसभेबाहेर आपल्या शेरोशायरी आणि दिलखुलास वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे कोरोनातून नुकतेच बरे झाले आहेत. सुमारे दोन आठवडे उपचार घेतल्या नंतर त्यांनी कोरोनावर मात केली असून आता पुन्हा नव्या जोमाने कामकाजाला सुरुवातही केली आहे. त्यामुळे पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी त्यांच्या दमदार एन्ट्रीचा ‘ तेरे को का लगता था की नहीं लौटेंगे… ‘ असा एक 27 सेकंदाचा व्हिडीओ तयार करून फेसबुकवर टाकला असून हा व्हिडीओ चांगलाच शेअर होत आहे.
जयंत पाटील यांनी ट्विट करून आपण कोरोनातून मुक्त झाल्याचं स्पष्ट केले आहे. ते आता १४ दिवसांचा क्वॉरंटाईन काळ पूर्ण करत राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लवकरच सहभागी होणार आहे. या काळात शासकीय यंत्रणेने वेळोवेळी केलेल्या सहकार्याबाबत त्यांनी आभार मानले आहेत. तसेच लोकांनी घाबरून जाऊ नये, कोरोना चाचण्या करून घ्याव्यात. आपण योग्य औषधोपचार घेऊन कोरोनावर मात करू शकतो, असेही पाटील यांनी म्हटले आहे.
याच दरम्यान पाटील यांच्या चाहत्याने एक 27 सेकंदाचा व्हिडीओ तयार केला असून त्याला टायगर अभी जिंदा है असे कॅप्शन त्याला दिले आहे. या व्हिडिओत जयंत पाटील समर्थकांसह चालताना दिसत असून विधानसभेत बोलताना दिसत आहेत. त्याच प्रमाणे यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचेही काही फोटो दाखवण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फेसबुक पेजवर हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पाटील यांच्या या दमदार एन्ट्रीच्या व्हिडीओमध्ये ‘मांझी- द माउंटेन मॅन’ या सिनेमातील एक डायलॉगही आहे.
https://twitter.com/Jayant_R_Patil/status/1368603244608380928