नाशिक : देवदर्शनासाठी जम्मू काश्मिर येथे गेलेल्या शहरातील देवी भक्तांच्या बँक खात्यावर सायबर चोरटयांनी डल्ला मारल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. महाराष्ट्रात परतल्यानंतर फसवणुकीचा हा प्रकार समोर आला असून देवी भक्ताने ग्राहक केंद्राशी संपर्क साधल्याने किमान सव्वा तीन लाख रुपये वाचविण्यात यश आले आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिन कोंडाजी शेळके (रा. बोधलेनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. हा व्यवहार आॅनलाईन झाला असून, विशेष म्हणजे भामट्यांनी शेळके यांच्या स्टेट बँक आॅफ इंडियाच्या बचत खात्यात १४ लाखाची रक्कमही जमा केली होती. १२ जानेवारी रोजी त्यांच्या खात्यात एकूण २३ लाख ७५ हजार रूपयांची उलाढाल झाली. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शेळके देव दर्शनासाठी वैष्णोदेवी येथे गेले होते. जम्मू आणि काश्मिर केंद्र शासीत प्रदेशात त्यांचे कार्ड बंद झाले होते. महाराष्ट्रात परतताच त्यांनी बँक खात्याची खातरजमा केली असता ही घटना उघडकीस आली. बँक खात्यातून तब्बल तेरा लाख रूपयांवर सायबर चोरट्यांनी डल्ला मारल्याचे लक्षात येताच त्यांना धक्का बसला. त्यांनी तात्काळ बँकेच्या ग्राहक केंद्राशी संपर्क साधून फसवणुकीची कल्पना दिली. त्यामुळे तीन लाख रूपये परत मिळविण्यात यश आले. मात्र, नऊ लाख ७५ हजार रूपयांवर भामट्यांनी डल्ला मारला.ज्या वेळी त्यांचे खाते हॅक झाले त्यावेळी चोरटयांनी त्यात काही व्यवहार केले. दुस-या खात्यातील पैसे वर्ग करण्यात आले. त्यानंतर सर्व रक्कम परस्पर काढण्यात आली. अधिक तपास निरीक्षक बोरसे करीत आहेत.