नाशिक – शहर गुन्हे शाखेच्या पथकाने एका अट्टल गुन्हेगाराला अटक केली आहे. जमिनीतून सोने काढून देतो तसेच सोन्याच्या विक्रीसाठी यज्ञ करण्याच्या बहाण्याने नागरीकांना लाखो रूपयांना गंडविणाºया भोंदूबाबास पोलीसांनी मुंबईत बेड्या ठोकल्या. गेल्या नऊ महिन्यांपासून संशयीत पोलीसांना गुंगारा देत होता. त्याच्या ताब्यातून बनावट सोन्याचे कॉईन आणि कोरे स्टँम्प पेपर हस्तगत करण्यात आले असून त्याच्याविरोधात चेक बाऊन्सचे तब्बल ४० हून अधिक गुन्हे शहर पोलीसात दाखल आहेत. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश जयराम जगताप (३७ रा.बंगला नं.९ श्रध्दा व्हिला,पाथर्डी फाटा) असे संशयीत भोंदू बाबाचे नाव आहे. गेल्या मार्च महिन्यात जगन्नाथ खंडेराव जाधव यांनी याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. संशयीताने जाधव यांना गाठून समाजसेवेचे व्रत घेतल्याचे भासवून, आमच्या कडे खूप सोने असून गोरगरिबासाठी रूग्णालय आणि मुलींचे वसतीगृह उभारण्याचा मानस व्यक्त केला होता. या उपक्रमासाठी मोठी रक्कम लागणार असून सोने विक्री करून ती रक्कम उभी करण्यात येणार आहे. तत्पूर्वी सोन्याचा यज्ञ करावा लागणार असल्याचे सांगून त्याने विश्वास संपादन करीत जाधव यांच्याकडून ५२ लाख रूपये हात उसनवार घेतले होते. याबरोबरच उखराज दीपाजी चौधरी यांना गाठून सोन्याच्या विटा जमिनीतून काढून देण्याच्या मोबदल्यात त्याने ११ लाख २६ हजार रूपयांना गंडा घातला होता. जमिनीतून काढलेली एक किलो वजनाची बनावट धातूची विट चौधरी यांच्या हातात ठेवून तो रोकड घेवून पसार झाला होता. या दोन्ही घटनांप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचे वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते. या घटनेची दखल घेत शहर पोलीस त्याच्या मागावर असतांनाच युनिटचे पोलीस नाईक शांताराम महाले यांना मिळालेल्या माहितीवरून संशयीत पोलीसांच्या हाती लागला. सदर भोंदूबाबा मुंबई येथील काश्मीरा पोलीस ठाणे हद्दीतील जीसीसी क्लब,हाटकेश येथे असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी (दि.१५) वरिष्ठ निरीक्षक आनंद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक रवाना झाले होते.
पोलीसांना संशयीतास हुडकून काढत बेड्या ठोकल्या असून त्याने दोन्ही गुह्यांची कबुली दिली आहे. संशयीताच्या ताब्यातून वेगवेगळ््या प्रकारचे भारतीय रिझर्व्ह बँकेचे लोगो असलेले ४० बनावट कॉईन आणि कोरे स्टॅम्प पेपर हस्तगत करण्यात आले आहेत. पोलीस तपासात त्याने अनेकांना गंडा घातल्याचे पुढे आले असून पैश्यांच्या मोबदल्यात धनादेश देवून त्याने मोठ्या प्रमाणात रकमा गोळा केल्याचे वास्तव आहे. सदरचे धनादेश परत आल्याने त्याच्याविरोधात १४ केसेस न्यायालयात दाखल करण्यात आले आहेत.
संशयितास इंदिरानगर पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक निलेश माईनकर करीत आहेत. दरम्यान फसवणुक झालेल्यांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याने संशयीताने कुणाची फसवणुक केली असल्यास इंदिरानगर पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. ही कारवाई उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार,सहाय्यक आयुक्त मोहन ठाकूर, निरीक्षक वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक महेश कुलकर्णी,रघुनाथ शेगर,हवालदार प्रविण कोकाटे,पोलीस नाईक शांताराम महाले,प्रविण वाघमारे व शिपाई समाधान पवार आदींच्या पथकाने केली.