हिसार – उत्तराखंडमधील चमोली येथे हिमकडा कोसळून झालेल्या जलप्रपातानं प्रत्येकाला हैराण केलं आहे. लोकांचा जीव वाचवण्यासाठी अजूनही बचावकार्य सुरू आहे. या दुर्घटनेत हिसारची मुलगी डॉ. ज्योती यांनी असं काम केलं आहे, जे कधीही विसरले जाऊ शकत नाही. त्या ८ महिन्यांच्या गर्भवती असतानाही त्या मदतकार्यात सक्रीय आहेत. त्यामुळेच त्यांचे देशभरात कौतुक होत आहे.
इंडो-तिबेट सीमा दलात (आयटीबीपी) असिस्टंट कमांडंट पदावरील हिसारच्या सेक्टर १६-१७मधील राहणारी डॉ. ज्योती यांना जोशीमठमध्ये आयटीबीपीच्या रुग्णालयात नोव्हेंबरमध्ये तैनात करण्यात आलं होतं. जोशीमठ इथल्या आयटीबीपीच्या रुग्णालयात रोजच्याप्रमाणे त्या काम करत असताना त्यांना हिमकडा कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर वीज प्रकल्पाअंतर्गत तयार केल्या जाणार्या बोगद्यामध्ये काही लोक फसल्याची माहिती मिळाली.
रुग्णालयात दोन डॉक्टर होते. एक डॉक्टर बचावपथकासोबत बोगद्याकडे रवाना झाला. तर दुसऱ्या डॉक्टर ज्योती यांनी रुग्णालयात सूत्रं सांभाळली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे डॉ. ज्योती आठ महिन्यांच्या गर्भवती असतानाही त्यांनी ही सगळी धावपळ केली. यादरम्यान सुरुवातीच्या ४८ तासांमध्ये त्यांनी झोपल्याविना १२ मजुरांना वाचवण्याचा प्रयत्न केला. गर्भवती असल्यानं त्यांनी आराम करावा असं उपस्थित स्टाफच्या सहकार्यांनी त्यांना सुचवलं. मात्र लोकांचा जीव वाचवण्याच्या आपल्या कामाच्या प्रति निष्ठेनं त्या विनाथकता काम करत राहिल्या.
ऑक्सिजन पातळी होती कमी
डॉ. ज्योती यांनी सांगितलं की, बोगद्यामध्ये १२ मजूर फसले होते. एका लोखंडी रॉडला पकडून ते मृत्यूशी लढत होते. त्यापैकी एक मजूर शायरी आणि गाणं ऐकवून इतर लोकांना प्रेरित करत होता. त्याच प्रेरणेमुळे ते १२ मजूर अनेक तास लोखंडी रॉडला पकडून लटकून राहिले. त्यांना जेव्हा रुग्णालयात आणलं गेलं तेव्हा काहींना हायपोथर्मिया तर काहींची ऑक्सिजनची पातळी घसरली होती. तसेच ते खूपच तणावात होते. ही दुर्घटना सकाळी दहाला झाली आणि बचावकार्यानंतर त्यांना सायंकाळी सहाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हा तिथं डॉ. ज्योती ह्या एकमेव डॉक्टर उपलब्ध होत्या. त्यामुळे त्यांनी त्वरित ऑक्सिजनचा पुरवठा केला. मजुरांना कपडे, जेवण दिलं. त्यांचा तणाव कमी करण्यासाठी नातेवाईकांशी फोनवर बोलणं करून दिलं. जवळपास तीन दिवस त्यांनी मजुरांची सेवा केली.
घरीच प्रसूतीचा निर्णय
डॉ. ज्योती यांचे वडील दिनेश कुमार हिसारमध्ये दक्षिण हरियाणा वीज विभागात कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत आहेत. आई चंद्रावती गृहिणी आहेत. त्यांचा विवाह सिरसा इथले अभियंता आशिष यांच्याशी झाला आहे. आशिष हे आयटीबीपीमध्ये अभियंता आहेत. नववा महिना सुरू होणारच होता आणि घरी जाऊनच प्रसूती करण्याचा आम्ही निर्णय घेतला होता, असं डॉ. ज्योती यांनी सांगितलं. परंतु मोठी दुर्घटना घडल्यानंतर आमचं सगळं नियोजन रद्द केलं. जोपर्यंत आपल्यात जीव आहे तोपर्यंत एक-एक व्यक्तिचा जीव वाचवायचा असा निश्चय केल्याचं त्यांनी सांगितलं.