मुंबई – जपानची दिग्गज वाहन निर्माता कंपनी होंडा कार्स आपली न्यू जनरेशन Honda HR-V यावर्षी भारतात लॉन्च करणार आहे. कंपनी या एसयूव्हीवर गेल्या अनेक दिवसांपासून काम करीत आहे. होंडा एचआरव्हीशी संबंधित बातम्या सातत्याने माध्यमांमध्ये येत असतात. मात्र आता कंपनीने स्वतःच दिवाळीच्या आसपास ही गाडी भारतात लॉन्च होणार असल्याचे सांगितले आहे. ही गाडी १ लीटर पेट्रोलमध्ये २६ किलोमीटरपर्यंतचा अॅव्हरेज देईल, असा दावाही कंपनीने केला आहे.
अलीकडेच होंडाने एचआर–व्ही एसयूव्हीच्या थर्ड जनरेशन मॉडेलला थायलंडच्या मार्केटमध्ये लॉन्च केले. पण भारतात आणखी काही नव्या अपडेट्ससह ही गाडी लॉन्च केली जाणार आहे, असे कळते. यात दमदार हायब्रिड पॉवरट्रेन असेलच. शिवाय इंटेरियर अधिक क्लासिक करण्यावरही जोर असणार आहे.
फिचर्स – होंडा एचआर–व्ही च्या नव्या मॉडेलमध्ये इंटेरियरमध्ये बदल असतील. मोठ्या टचस्क्रीनची इन्फोमेंट सिस्टीम, स्मार्टफोन कनेक्टीव्हीटी फिचर, होंडा कनेक्ट डिस्प्ले, पॅनारॅमिक सनरुफ, वायरलेस चार्जर, आॉटोमॅटिक एसी, हॅंड्स फ्री पॉवर टेलगेट यासारखे फिचर्स यामध्ये असतील. याशिवाय अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम, इलेक्ट्रॉनिक्स ब्रेकफोर्स डिस्ट्रीब्यूशन, रिअर पार्किंग सेंसर आणि कॅमेरा आदी फिचर्सही असणार आहेत.
इंजिन – यात १.५ लीटरचे पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. ते कॉम्पॅक्ट असेल. तसेच लिथीयम आईऑन बॅटरीचा वापर यामध्ये असेल. या कारचे इंजिन आणि इलेक्ट्रीक मोटर मिळून १०९ पीएसचा पॉवर जवरेट करतील. एसयूव्ही २६.७ किलोमीटरपर्यंतचे मायलेज देते.