दुर्ग (छत्तीसगड) – दूर्ग जिल्ह्यात पाटन नावाच्या तालुक्यात खोला नावाचे एक गाव आहे. आदर्श गाव म्हणून ओळख असलेल्या खोलामध्ये कलावंतांची खाणच आहे. ८०० लोकासंख्या असलेल्या या गावात जवळपास ३५० कलावंत आहेत. यात १६ राष्ट्रीय स्तरावरील असून आतापर्यंत बारापेक्षा अधिक राज्यांमध्ये पंथी नृत्य, जसगीत नृत्य आणि फाग गीताच्या सादरीकरणासाठी वारंवार जाऊन आले आहेत.
या छोट्याशा गावात पद्मश्रीपासून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंतचे कलावंत बघायला मिळतील. राधेश्याम बारले नावाच्या कलावंतांला २०२१ मध्ये पद्मश्री मिळालेला आहे. पंथी नृत्य करणाऱ्या मंडळात जवळपास ५० महिला–पुरुष कलावंत आहेत. तर जसगीतमध्ये १५० पेक्षा अधिक लहान मुले, वृद्ध व युवा कलावंत आहेत.
फाग गीतच्या तीन चमू असून तिन्ही मिळून १५० कलावंत आहेत. या गावात देशाच्या विविध भागांमधील लोककलावंत प्रशिक्षणासाठी येतात. या गावात जय सतनाम पंथी तसेच सांस्कृतिक समितीचे विशेष वर्चस्व आहे. या समितीचे एकूण १६ कलावंत राष्ट्रीय स्तरावर आपला झेंडा गाडून आले आहेत.
पद्मश्री राधेश्याम बारले, देव सिंह भारती, अर्जून माहेश्वरी, पंचराम जांगडे, जॉन कोठारी, शिवनाथ बंजारे, महेंद्र चेलक, गणेश कोसरे, कृष्ण कोसरे आदींचा समावेश आहे. याशिवाय राज्य स्तरावर कामगिरी करणारेही अनेक कलावंत या मंडळात आहेत.
पद्मश्री बारले यांनी सांगितले की, ‘३५० कलावंतांच्या या गावात ४ मंडळे आहेत. यात महिला, पुरुष आणि तरुणांचा समावेश आहे. तसे बघितले तर प्रत्येक घरात कलावंत आहेत. कुणी पंथी, कुणी जसगीत तर कुणी फागगीतात प्रसिद्ध आहे.
त्यासोबतच ढोल, हार्मोनियम, बासरी, ताशा आदी वाद्ययंत्र वाजविणारेही कलावंत मोठ्या प्रमाणात आहेत. या कलावंतांनी महाराष्ट्र, राजस्थान, हरियाणा, आसाम, उत्तर प्रदेश, बिहार, मध्यप्रदेश आदी राज्यांमध्ये आपल्या कलेचे सादरीकरण केले आहे.