ज्ञानेश्वर क्षीरसागर हे नाव आठवतंय ? या वर्षीच्या सुरूवातीला सोशल नेटवर्कींग फोरमने एका दृष्टीहीन तरुणाच्या अर्थार्जनासाठी कॅलेंडर विक्रीचा स्टाॅल सुरू करून दिला होता. आणि सोशल मिडीयावरील आमच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपण सर्वांनी त्याच्याकडून शेकडो कॅलेंडर्स विकत घेतली होती. हो, तोच ज्ञानेश्वर आज बँकेत प्रोबेशनरी ऑफीसर झालाय ही आपल्या सर्वांसाठी अतीशय आनंदाची बातमी आहे.
– प्रमोद गायकवाड, अध्यक्ष, सोशल नेटवर्किंग फोरम, नाशिक
तीन चार वर्षांपूर्वी काही अंध सदस्यांच्या ऑर्केस्ट्रा आयोजनात एसएनएफने मदत केली होती. त्यात ज्ञानेश्वरही होता. तेंव्हापासून तो आपल्यासोबत जोडला गेला आणि त्याच्या उपजीविकेसाठी आपण मदतही केली. यावर्षीच्या सुरुवातीला लावून दिलेल्या कॅलेंडर विक्रीच्या स्टॉलमधूनही त्याला अर्थार्जन झाले. पुढे काही परिचयातल्या हॉस्पिटल्सशी बोलून त्यांना फिनाईल सारखे नेहमी लागणारे उत्पादन विक्रीचा व्यवसाय उभारून त्याला कायमस्वरूपी उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देण्याचे आमचे नियोजन सूरू होते. मधल्या काळात त्याने बँक अधिकारी पदाच्या परीक्षेची तयारी केली. भरपूर अभ्यास केला. एका बाजूला कुटुंब सांभाळून स्वकष्टातून चरितार्थाचीही बाजू सांभाळली तर दुसऱ्या बाजूला आपल्या स्वप्नांचा पाठलाग सुरु ठेवला. याचा परिणाम म्हणजे लेखी आणि तोंडी परीक्षा क्लीअर करून ज्ञानेश्वरीची कॅनरा बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून निवड झाली.










