नवी दिल्ली – कोरोनाच्या संकटकाळात दिलासा देणारी बातमी आहे. कोरोना संसर्गाची तपासणी करण्यासाठी आरटी-पीसीआर किट रिलायन्स लाइफ सायन्सेसने विकसित केले आहे. या पद्धतीद्वारे फक्त दोन तासात कोरोनाचा चाचणीचा निकाल पाहता येणार आहे. कोरोना संसर्गाची तपासणी करण्यासाठी आरटी-पीसीआर किटच्या निकालासाठी सध्या सुमारे २४ तास लागतात. यामध्ये, कोरोनामध्ये उपस्थित न्यूक्लिक ऍसिडची चाचणी केली जाते. रिलायन्स लाइफ सायन्सेस ही कंपनी मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडशी सहाय्यक कंपनी आहे.
शास्त्रज्ञांनी भारतात कोरोना विषाणूपासून १०० पेक्षा जास्त जीनोम अनुक्रमांचे विश्लेषण केल्यानंतर हे आरटी-पीसीआर किट तयार केले आहे. आरटी-पीसीआर किट पद्धत ही कोरोना संसर्गाची सर्वात अचूक चाचणी मानली जाते. रिलायन्सच्या वैज्ञानिकांनी त्याचे नाव आर-ग्रीन किट असे ठेवले असल्याचे स्पष्ट झाले आहे. समाधानकारक कामगिरीबद्दल या पद्धतीसाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) कडून तांत्रिक मान्यता मिळाली आहे. परंतु आयसीएमआरने किटच्या डिझाइनला अजून पूर्णपणे मान्यता दिलेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार हे किट कोरोना विषाणूची ई-जीन, आर-जीन्स आणि आरडीआरपी चा उपयोग करतात. आयसीएमआरच्या तपासणीनुसार, यात ९८ टक्के यशस्वी निकाल प्राप्त झाले आहेत. संबंधित संशोधन वैज्ञानिकांनी स्वदेशी तंत्रज्ञानाने पूर्ण केल्याची माहिती देण्यात आली आहे.