पिंपळगाव बसवंत (ता. निफाड) – जनावरांनाही “टॅग” लावून वेगळी ओळख देण्याचा उपक्रम केंद्र सरकारकडून राबविला जात आहे. शनिवारी (दि. १७) निफाड तालुक्यातील कारसूळ येथे या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
नाशिक जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत नाशिक जिल्ह्यात राष्ट्रीय पशु रोग नियत्रंण अंतर्गत लाळ खुरकत लसीकरण मोहीम व पशुधनास टॅगिंग कार्यक्रम जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.विष्णू गर्जे, निफाडचे सहाय्यक आयुक्त निफाड तालुका पॉलिक्लिनिक डॉ.रवींद्र चांदोरे, निफाड पंचायत समितीचे पशुधन विकास विस्तार अधिकारी डॉ.सुनील आहिरे यांच्या मार्गदर्शनाने निफाड तालुक्यात राबविला जात आहे. यात निफाड तालुक्यातील कारसूळ या गावची प्रथम निवड करण्यात आली आहे. शनिवारी तब्बल ४०० जनावरांना टॅग लावण्यात आले.
राष्ट्रीय पशु रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत लाळ खुरकत लसीकरण मोहीम व प्रत्येक पशुधनास टॅगिंग करुन जनावरास ओळख निर्माण करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन हा राष्ट्रीय कार्यक्रम कारसूळ येथे आयोजित केला गेला. या कार्यक्रमाचे उदघाटन कारसूळ येथील सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र काजळे व पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी – २ दावचवाडीचे डॉ. राजेंद्र केदार यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी कारसूळ येथील पशुपालक सोपान शंखपाळ, धोंडीराम काजळे, प्रभाकर काजळे आदी उपस्थित होते. या पशुधनास टॅगिंग व लाळ खुरकत लसीकरणासाठी डॉ. नामदेव नामेवार, डॉ.किरण खरात, डॉ.रामदास कुयटे, डॉ.प्रवीण शिंदे, डॉ.शुभम म्हस्कर, डॉ.जगदीश गुंजाळ, डॉ.पंकज कुयटे, डॉ.वैभव शिंदे, प्रकाश निखाडे उपस्थित होते.
त्याशिवाय खरेदी-विक्री नाही
यावेळी डॉ.राजेंद्र केदार यांनी जनावरांना बिल्ले मारण्याच्या फायद्याविषयी पशुपालकांमध्ये जनजागृती केली. त्यांनी सांगितले की आपण आपल्या जनावरांना १२ अंकी स्कॉन कोड बिल्ला टॅगिंग केला तर भविष्यात कोणतीही जनावरे उदा. बैल, गाय, म्हैस, वासरु आदींच्या कानात बिल्ले असल्याशिवाय यापुढे खरेदी – विक्री करता येणार नाही. जनावर नैसर्गिक अापत्तीने दगावल्यास उदा. विज पडून, विद्युत तारेचा शॉक, वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत पडल्यास त्यांना टॅग असल्याशिवाय शासकीय भरपाई मिळणार नाही. किंवा कोणत्याही बॅकेचे कर्ज घेण्यासाठी किंवा विम्याकरीता या बिल्याचा उपयोग होणार आहे. म्हणून हे बिल्ले मारले गेले पाहीजे. देशातील सर्व जनावरांसाठी ऑनलाईन नोंदणी आहे. म्हणजे माणसाप्रमाणेच आधार कार्डसारखी ही ओळख असेल.
—
पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी – २ मध्ये येणाऱ्या सर्व गावातील पशुपालकांना आवाहन करतो की, प्रत्येकाने आप-आपल्या पशुधानाचे टॅगिंग करुन पशुधनाची ओळख निर्माण करुन घ्यावी.
– डॉ.राजेंद्र केदार, पशुवैद्यकीय अधिकारी, श्रेणी – २, दावचवाडी.
—
जनावर चोरीस गेल्यास जनावर मालकास शोधण्यास मोठी कसरत करावी लागते. पण आता १२ अंकी बिल्ला टॅगिंग केल्यामुळे पशुधन चोरीस पण आळा बसेल. तसेच वेळोवेळी दावचवाडी श्रेणी – २ डॉक्टर नवनवीन योजनांची माहिती देणार असून, पशुपालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
– देवेंद्र धोंडीराम काजळे, सामाजिक कार्यकर्ते, कारसूळ