जनजाती बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी…
जनजाती समाजाच्या उन्नतीसाठी देशभर विविध उपक्रम, प्रकल्पांद्वारे प्रयत्न सुरु आहेत. वनवासी कल्याण आश्रमाचे हे कार्य गेल्या ६८ वर्षांपासून अव्याहतपणे समर्पित वृत्तीचे कार्यकर्ते करीत आहेत.पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे मुख्यालय नाशिकमध्ये एच.पी.टी. महाविद्यालय रस्त्यापासून नजीक असलेल्या कृषिनगरमध्ये आहे. प्रामुख्याने जनजातींच्या संस्कृती, परंपरांंची जोपासना करणे व सर्वांगीण विकास घडवून आणणे हेच या कल्याणकारी सेवाकार्याचे उद्दिष्ट आहे.
- – संजय देवधर (लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)
हजारो वर्षांपूर्वी वनांमधून आपली संस्कृती विकसित होत गेली.या नवजात संस्कृतीची जोपासना रानावनात राहाणाऱ्यांंनी प्राणपणाने केली. खरं तर आपलं वनवासी समाजाशी रक्ताचं नातं आहे. पण स्वातंत्र्यानंतरही त्यांच्या वाट्याला उपेक्षाच आली. ही परिस्थिती बदलण्यासाठी महात्मा गांधींचे शिष्य ठक्करबाप्पा यांनी सेवाकार्य सुरु केले. त्यापासून प्रेरणा घेऊन रमाकांत उर्फ बाळासाहेब देशपांडे यांनी ‘वनवासी कल्याण आश्रम’ या सामाजिक संस्थेची स्थापना केली. मध्य प्रदेशातील जशपूर या गावात एका मराठी माणसाने सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून हा सेवायज्ञ आरंभला, ही लक्षणीय बाब म्हटली पाहिजे. दि.२६ डिसेंबर १९५२ रोजी सुरू झालेल्या या व्रताचरणाला आता ६८ वर्षे पूर्ण झाली आहेत. तत्कालीन सरसंघचालक श्री.गोळवलकर गुरुजींचे आशीर्वाद व मार्गदर्शन देशपांडे यांना मिळाले. आता हे कार्य देशभर विस्तारले आहे. परिणामी शहरी कार्यकर्त्यांच्या जोडीने पाड्या – वस्त्यांमधले बांधव आपापल्या परीने योगदान देत आहेत. हजारो सेवा प्रकल्पांंच्या माध्यमातून विविध जनजातींंचे सबलीकरण, सक्षमीकरण करण्यासाठी प्रयत्न केले जातात. त्याचवेळी या सामूहिक स्तरावर राष्ट्रीय भावना जागविण्यासाठी आणि एकात्मिक विकासाकरिता सर्वतोपरी प्रयत्न केले जातात.नाशिक जिल्ह्यात गुही येथे अनुदानित आश्रमशाळा चालविण्यात येते. दोन वर्षांपूर्वी या शाळेला राज्यस्तरीय आदिवासी सेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
‘वनवासी कल्याण आश्रम’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या संस्थेचे आता महाराष्ट्रात ‘जनजाती कल्याण आश्रम’ असे नामकरण करण्यात आले आहे. निरलस कार्यकर्त्यांची निष्ठा आणि समर्पित वृत्तीचं अधिष्ठान हे या संस्थेचं पूर्वापार शक्तिस्थान राहिलेलं आहे. देशपातळीवर ३६ प्रांतांमध्ये विभागणी असलेल्या या संघटनेचे महाराष्ट्रात ४ प्रांत आहेत. त्यात नाशिकसह पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, अहमदनगर, सोलापूर या जिल्ह्यांंचा समावेश होतो.’तू – मैं, एक रक्त’ हे ब्रीदवाक्य असलेल्या या संघटनेची सेवाकार्ये ६ प्रकारे चालतात. जंगल – वनविकास, जमीनविकास, जलविकास, जनावरविकास, कौशल्यविकास आणि आरोग्यरक्षण यांना प्राधान्य देण्यात आले आहे. कल्याण आश्रमाच्या माध्यमातून कोरोनाच्या संकटकाळात गरजूंना रेशन वाटप करण्यात आले. ज्या जनजाती बांधवांकडे इतक्या वर्षात रेशनकार्डेच नव्हती, त्यांना कार्यकर्त्यांनी ती मिळवून दिली. मदतकार्यासाठी एक विशेष हेल्पलाईन तयार करुन समस्यांचे निराकरण करण्यात आले. दुर्गम, अतिदुर्गम भागांत भोजनासाठी शिधा, शेतीतील पेरणीसाठी बी- बियाणे, खते यांचेही वितरण करण्यात आले. अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाचे सेवाकार्य आता देशाच्या सीमांंपर्यंत पोहोचले आहे.
कल्याण आश्रमाचे एकंदरीत ४५१० शैक्षणिक प्रकल्प असून २३१ वसतिगृहे आहेत. सुमारे १ लाख ३८ हजारांहून अधिक लाभार्थी विविध उपक्रमांचा लाभ घेतात.३२६ ग्रामविकास प्रकल्पांत कार्य चालते. १७६७ स्वमदत गट कार्यरत आहेत. २०६ वैद्यकीय केंद्रांमध्ये सेवाभावी डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्यसेवक समर्पित भावनेने काम करतात. लाखो रुग्णांवर उपचार करून त्यांना रोगमुक्त करण्यात त्यांना यश मिळाले आहे. २४६२ क्रीडा केंद्रांंद्वारे युवकांमधील क्रीडागुणांना प्रोत्साहन दिले जाते. ५७५२ सत्संग केंद्रे व ६७६ सांस्कृतिक केंद्रे मानसिक, कलात्मक उन्नतीसाठी उपयुक्त ठरतात. एकूण १४ हजार प्रकल्पस्थानी २० हजारांपेक्षा जास्त प्रकल्पांंचा विस्तार झालेला आहे. पश्चिम महाराष्ट्र प्रांत स्तरावर वसतिगृहे, प्राथमिक व माध्यमिक शाळा, आश्रमशाळा, बालसंस्कार केंद्रे यांच्या माध्यमातून शैक्षणिक प्रकल्प राबविले जातात. अर्थात हे काम शासनाच्या कामाला पूरक असेच आहे. आर्थिक विकास प्रकल्पांत १० बचतगटांचे २८०० लाभार्थी आहेत. ७ ठिकाणी ग्रामविकास प्रकल्प सुरु आहेत. याशिवाय श्रद्धा जागरण केंद्र चालविण्यात येते. पुरुष-महिला पूर्णवेळ कार्यकर्ते व त्यांच्या मदतीला ग्रामसमिती, महिला विभाग सेवाकार्यासाठी कायमच सज्ज असतो.जवळपास जीवनाच्या सर्वच क्षेत्रांमध्ये विविध आयामांतून कल्याण आश्रमाचे कार्य समाजापर्यंत पोहोचते आहे. अगदी नागालँड, मिझोराम, मणिपूर, अरुणाचल प्रदेश अशा देशाच्या पूर्व सीमेवरील दुर्गम भागापर्यंत अविरतपणे सेवाकार्य सुरु आहे.
आदिवासी परिघातील प्रबोधनपर्व !
वारली जमातीने त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय – शोषणाविरुद्ध लोकलढा दिला होता. त्याला यंदा ७५ वर्षे झाली आहेत. कॉ.गोदावरी परुळेकर यांनी ५० वर्षांपूर्वी ‘जेव्हा माणूस जागा होतो’ हे पुस्तक लिहिले होते, त्याचे यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. आदिवासी परिघात अनेकांच्या प्रयत्नांनी जाणीव – जागृती झाली आहे. मोबाईल फोनमुळे त्यांच्या संथ जीवनाला गती मिळाली आहे. राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाला स्वतंत्र बजेट असूनही त्याप्रमाणात विकासाला गती नाही.
जनजाती कल्याण आश्रमाच्या पूरक सेवाकार्याने काही समस्या दूर व्हायला निश्चितच मदत होत आहे. अलीकडे उच्च शिक्षणाचा लाभ मिळालेल्या व त्यामुळे साहजिकच नोकरीपेशात स्थिरावलेल्या काही आदिवासी बांधवांचा आर्थिक, सामाजिक स्तर उंचावलेला दिसतो,ही बाब स्वागतार्ह आहे.हे प्रागतिक स्थित्यंतर अधिक व्यापक हवे. मात्र त्याचबरोबर या नव्या नागरी जीवनशैलीत त्यांच्या लोकसंस्कृतीचे वेगळेपण झाकोळून जाता कामा नये. त्यांचे निसर्गस्नेही रीतिरिवाज, परंपरा, कला टिकल्या पाहिजेत असे प्रकर्षाने वाटते. कोरोनाच्या संकटाने निसर्गाचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. निसर्गाशी स्वतःला जोडून घेतले तरच मानवजात टिकेल हे नक्की. निसर्गातील संसाधनांचा वापर गरजा भागविण्यासाठी करताना त्यांचे रक्षण, संवर्धन, पर्यावरण संतुलन महत्वाचे आहे. आदिवासी वारली जमात आपल्या आचरणातून सृष्टिसंवर्धननाचा वारसा प्राणपणाने जपते,हा दिलासा खूप मोठा आहे.