नाशिक – कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी नाशिकमध्ये मिशन झिरो मोहीम राबविण्यात येत आहे. त्याला बळ देण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीतर्फे दोन दिवस विनामूल्य आयुष काढ्याचे वितरण करण्यात आले. सुमारे १५०० पेक्षा जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन गरम काढ्याचा लाभ घेतला.
पंचवटी कारंजावर शहर बस थांब्याजवळ शनिवारी ( दि.८) सकाळी ११ वाजता आयुष काढा विनामूल्य वितरणाला प्रारंभ करण्यात आला. केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने हा आयुष काढा प्रमाणित केला आहे. गरम काढा नियमितपणे प्यायल्याने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पंचवटी गटाने या उपक्रमाचे आयोजन केले. प्रारंभी भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व जवळच्या पोलीस चौकीतील पोलीस बांधवांना तसेच नामको बँकेचे उपाध्यक्ष प्रफुल्ल संचेती यांना गरम काढ्याचे वितरण करण्यात आले. सर्व वयोगटातील स्त्रीपुरूष तसेच ज्येष्ठ नागरिक, पत्रकार यावेळी उपस्थित होते. त्यांना आयुष काढा देण्यात आला. एकूण सुमारे ८०० जणांनी सहभागी होऊन विनामूल्य काढ्याचा लाभ घेतला. काल रविवारी (दि.९) जवळपास तेवढ्याच नागरिकांना काढा देण्यात आला. काही जणांनी बरोबर बाटली आणून त्यात कुटुंबीयांसाठी काढा नेला.यावेळी आयुष काढ्याच्या बाटल्यांचीही ना नफा ना तोटा तत्वावर विक्री करण्यात आली. दोन दिवसांत सुमारे २५० बाटल्या नागरिकांनी खरेदी केल्या.
यावेळी गॅस शेगडी, सिलेंडर, ४० लिटर शुद्ध पाण्याचे २० जार व इतर आवश्यक साहित्याची व्यवस्था करण्यात आली. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आदित्य गर्गे, प्रद्युम्न वाणी,प्रवीण लोखंडे, तेजस थोरात, निनाद पंचाक्षरी,अथर्व जालिहालकर,निनाद पुजारी या स्वयंसेवकांनी व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. यानंतर लवकरच रविवार कारंजा व भद्रकाली मंदिराजवळ आयुष काढ्याचे विनामूल्य वितरण करण्यात येणार आहे. त्याचे नियोजन सुरु आहे अशी माहिती संयोजकांनी दिली आहे व या परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.