मुंबई – प्रायव्हसी पॉलिसीमध्ये केलेल्या बदलांमुळे सध्या व्हॉट्सअॅप चांलगेच चर्चेत आहे. ८ जानेवारीपासून ही पॉलिसी लागू झाली आहे. या अंतर्गत यूझर्सना खासगी डेटा फेसबुकवर शेअर करणे अनिवार्य असेल. मात्र आणखी एका कारणाने व्हॉट्सअॅप चर्चेत आहे. ते म्हणजे जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांच्यामुळे. कारण त्यांनी आपण व्हॉट्सअॅप वापरत नसल्याचे ट्वीटवरून जाहीरपणे सांगितले आहे.
एलन मस्कसारखी व्यक्ती व्हॉट्सअॅप वापरत नाही तर नेमके काय वापरते, असाही प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. त्याचे उत्तरही त्यांनी दिले आहे. आपण सिग्नल नावाचे एक अॅप मेसेजिंगसाठी वापरत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. अलीकडेच एलन मस्क या अमेरिकेतील उद्योगपतीला जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती म्हणून घोषित करण्यात आले. ते टेस्ला या इल्क्ट्रीक कारच्या कंपनीचे तसेच स्पेसशी संबंधित एक्स या कंपनीचे मालक आहेत. त्यांनी स्वतःबद्दल सांगताना इतरांनाही सिग्नल हे अॅप वापरण्याचे आवाहन केले आहे. हे एक इन्स्टंट मेसेजिंग अॅप आहे आणि जगातील सर्वांत सुरक्षित असे एप मानले जात आहे. पण गमतीदार बाब म्हणजे त्यातही व्हॉट्सअॅपनेच गुंतवणूक केलेली आहे.
‘सिग्नल’ हे व्हॉट्सअॅपपेक्षा वेगळे कसे
एलन मस्कने ट्वीट केल्यानंतर लोक सिग्नल अॅप डाऊनलोड करायला लागले आहेत. गुगल प्ले स्टोअरवर या अॅपला ४.५ स्टार देण्यात आले आहेत. आतापर्यंत दहा लाखांपेक्षा अधिक लोकांनी हे एप डाऊनलोडही केले आहे. ज्याच्यासोबत आपण चॅट करीत आहोत तो चॅटचे स्क्रीनशॉट घेऊ शकत नाही, असे फीचर या अॅपमध्ये देण्यात आले आहे. याशिवाय युझरची कुठलीही खासगी माहिती यात घेतली जात नाही.