नवी दिल्ली – जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेला भारतात प्रारंभ झाला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचं उद्धाटन करण्यात आले आहे. कोरोना योद्धयांना सर्वात आधी लस दिली जाणार आहे. त्यापैकी काही जणांशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दूरचित्रसंवादाद्वारे संवाद साधला. लसीकरणासाठी तयार करण्यात आलेल्या ‘कोविन ऍपचं लोकार्पणही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात २८५ ठिकाणी लस दिली जाणार आहे.
देशातील २ हजार ९३४ लसीकरण केंद्रांपैकी ठराविक केंद्रातील लाभार्थ्यांना प्रधानमंत्र्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. राज्यात २७९ ठिकाणी कोवीशिल्ड तर ६ ठिकाणी कोवॅक्सीन लस दिली जाणार आहे. त्यासाठी या केंद्रावरील अधिकाऱ्यांना तंत्रज्ञानाविषयक आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
एका केंद्रावर दररोज एका सत्रात १०० जणांचे लसीकरण करण्याची सूचना राज्यांना देण्यात आली आहे. लसीकरणादरम्यान काही मात्रा वाया जाण्याची शक्यता गृहीत धरून प्रति १०० कुप्यांमागे दहा कुप्या राखीव ठेवण्यात येणार आहेत.
देशात सुरु झालेली ही जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम आहे. त्यामुळे आरोग्य मंत्रालयाने राष्ट्रपतींच्या कार्यालयाशी सल्लामसलत करून पोलिओ लसीकरणाच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला असून पोलिओ लसीकरण ३१ जानेवारीला असेल, असे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
—
पंतप्रधान मोदी म्हणाले
- इतिहासाह अशी घटना कधीच घडली नव्हती. इतक्या मोठ्या प्रमाणात आपण लसीकरण कार्यक्रम हाती घेतला आहे.
- भारतात लस ही परदेशाच्या तुलनेत अत्यंत स्वस्त दरात उपलब्ध झाली आहे
- लसीचा वापरही अतिशय सोपा आहे
- भारतीय लस ही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि वाहतुकीपासून अनेक बाबींनी उजवी आबे
- कोरोना लसीचे दोन डोस घ्यावे लागतील.
- लस घेतल्यानंतरही आवश्यक ती काळजी घ्यावी लागेल