वॉशिंग्टन – महागडा तुरुंग हा काय प्रकार आहे, असा प्रश्न शीर्षक वाचून पडला असेल ना. अमेरिकेतील गुआंतानामो हा जगातील महागडा तुरुंग आहे. येथून कैद्यांना सोडून देण्याची प्रथा तत्कालीन अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी बंद केली होती. आता नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यावर काय निर्णय घेणार याबाबत चर्चा सुरु आहे. पण, या तुरुंगात नेमके कोणते कैदी असतात, आणि त्याला महागडा म्हणण्याचे कारण काय असावे, हे आपण पाहू.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बाराक ओबामा यांनी हा तुरुंग सर्वात महागडा असल्याचे म्हटले आहे. एका अहवालानुसार, येथील एका कैद्यावर वर्षाला तब्बल ९ लाख डॉलर म्हणजेच ५.६ कोटी रुपये खर्च होतात. तर याच्या देखभालीसाठी पेंटागॉन दरवर्षी ९ अब्ज रुपये खर्च करते. हा सगळं खर्च पाहता, आपण हा तुरुंग बंद करण्याचा प्रस्ताव काँग्रेसमध्ये मांडणार असल्याचे ओबामा म्हणाले होते. त्याला जर मान्यता मिळाली नाही तर स्वतःचे विशेषाधिकार वापरून तुरुंग बंद करण्याचे त्यांनी ठरवले होते. पण, त्यांच्या कार्यकाळात काही ही गोष्ट होऊ शकली नाही.
न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालानुसार, त्यावेळी येथे वेगवेगळ्या देशातील १०७ कैदी होते. आतापर्यंत जवळपास ७८० कैद्यांनी या तुरुंगाची हवा खाल्ली आहे. यातील ६६४ कैद्यांना दुसऱ्या तुरुंगात हलवण्यात आले होते. ११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हा तुरुंग अस्तित्वात आला.
तत्कालीन बुश सरकारने अफगाणिस्तान तसेच इराकसह जगातील अन्य ठिकाणच्या संशयित दहशतवाद्यांना पकडून या तुरुंगात ठेवले होते. २००२ मध्ये येथील कैद्यांचे फोटो सार्वजनिक झाले. साखळदंडात अडकलेले हे कैदी पाहिल्यानंतर जगभरातून टीकेची झोड उठली होती. त्यानंतर या कैद्यांसोबत किमान चांगला व्यवहार करण्याची मागणी केली होती.