नवी दिल्ली – टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही जगातील तिसरी सर्वात मोठी माहिती तंत्रज्ञान (आयटी) सर्व्हिस फर्म बनली आहे. तर अॅसेन्ट आणि आयबीएम ची नावे पहिल्या दोन क्रमांकावर आहेत. जगातील पहिल्या १० आयटी कंपन्यांमध्ये टीसीएस, इन्फोसिस, एचसीएल आणि विप्रो या चार भारतीय कंपन्यांचा समावेश आहे.
ब्रँड फायनान्सच्या अहवालात असे म्हटले आहे की, वाढत्या परदेश व्यापारामुळे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) आणखी वाढीच्या मार्गावर आहे. हे वर्ष कंपनीसाठी अधिक फायदेशीर ठरणारे असून ११ टक्के वाढीसह टीसीएसची ब्रँड व्हॅल्यू १५ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे. अॅसेन्ट ही २६ अब्ज डॉलर्सची ब्रँड व्हॅल्यू असलेली सर्वात मूल्यवान आयटी कंपनी आहे. तर आयबीएमचे ब्रँड मूल्य १६.१ अब्ज आहे. टीसीएसने आयबीएममधील फरक लक्षणीयरीत्या कमी झाला आहे.
ब्रँड फायनान्सचे सीईओ डेव्हिड हे म्हणाले की, टीसीएसचे सीईओ राजेश गोपीनाथन यांच्या नेतृत्वात टीसीएस वेगाने पुढे गेली आहे. तर टीसीएसची चीफ मार्केटींग ऑफिसर राजश्री आर म्हणाल्या की, एक ब्रँड म्हणून टीसीएसची ताकद ही कंपनीमधील ग्राहकांच्या विश्वासाची साक्ष आहे. तसेच या अहवालानुसार, सुमारे १४ अब्ज डॉलर्सच्या ब्रँड व्हॅल्यूसह इन्फोसिस चौथ्या स्थानी असून सर्वाधिक वेगाने विकसित होणारा आयटी ब्रँड असे इन्फोसिसचे वर्णन केले गेले आहे. कॉग्निझंट ८ अब्ज डॉलर्ससह पाचव्या स्थानावर आहे. भारतीय कंपनी एचसीएल सातव्या तर विप्रो नवव्या क्रमांकावर आहे. टेक महिंद्रा देखील मोठया आघाडीसह १५ व्या स्थानी येण्यात यशस्वी ठरली आहे.