मुंबई – आपल्या तरल आवाजाने श्रोत्यांच्या काळजाचा ठाव घेणारे गायक म्हणून गझल गायक जगजीत सिंग ओळखले जातात. गझल गायन हा तसा क्लिष्ट प्रकार. तसे तर कोणत्याही गाण्यातील शब्द हे भाव ओळखून आणि ते आवाजात ओतून गावे लागते. पण, त्यातही गझलसाठी हे तंत्र फारच सांभाळावे लागते. पण, हा प्रकारही जगजीत सिंग यांनी लीलया हाताळला. अशा या अवलिया कलाकाराचा ८ फेब्रुवारी हा जन्मदिवस.
प्रचंड प्रतिभा असूनही त्यांनी कधीही प्रसिद्धी मागे धाव घेतली नाही. मुंबईत आल्यावरही त्यांनी सुरुवातीला जिंगल्स गायल्या. त्यानंतर गझल म्हटल्या तसेच काही चित्रपटांमध्ये पार्श्वगायन करण्यासोबतच संगीतही दिले. प्रसिद्धीच्या शिखरावर असताना गझल गायक तलत महमूद आणि मुकेश या आपल्या आवडत्या गायकांची गाणी म्हणण्यातही त्यांना कधी कमीपणा वाटला नाही. तरल गायनाचा कोणताही प्रकार त्यांना वर्ज्य नव्हता. जेवढ्या आर्ततेने ते गझल सादर करत तेवढ्याच आर्ततेने आणि प्रेमाने भगवंतालाही साकडे घालत. त्यामुळेच त्यांच्या आवाजातील भजने ऐकताना मनाला समाधान मिळते.