नवी दिल्ली – गेल्या वर्षीपासून जगभरात थैमान घातलेल्या कोरोना आजारामुळे तब्बल २० लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. यातील १० लाख लोक तर अवघ्या ११४ दिवसांत मृत्युमुखी पडले आहेत. याबाबत संयुक्त राष्ट्रसंघाचे प्रमुख एंटोनिया गुटारेस यांनी चिंता व्यक्त केली असून सर्वांनी मिळून या संकटाचा सामना करण्याचे आवाहन केले आहे.
या आजारामुळे ज्यांनी आपल्या निकटवर्तीयांना गमावले आहे, त्यांचे नुकसान कधीच भरून निघणारे नाही, याची आम्हाला जाणीव आहे. पण, किमान यापुढे अधिक मृत्यू टळावेत यासाठी आपण निश्चितच प्रयत्न करू शकतो, असेही गुटारेस यांनी म्हटले आहे. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. तसेच लोकांचा जीव वाचावा यासाठी सरकारने जलदगतीने काम करायला हवे. कोरोनावरील आलेल्या लसीबाबतच्या अफवा रोखण्यासाठी देखील प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
१९१ देशांमध्ये आढळले रुग्ण
जगातील १९१ देशांमध्ये या आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात चीनमध्ये आढळलेला हा आजार मार्च २०२० पर्यंत जगभरात पसरला. आणि सर्वांना लॉकडाऊनचा सामना करावा लागला. केवळ आरोग्यच नव्हे तर आर्थिकदृष्ट्या देखील या आजाराने जग हलवून सोडले. आर्थिक व्यवहार ठप्प झाले तर अनेकजण बेरोजगार झाले. हातावर पोट असलेल्यांना तर उपासमारीला तोंड द्यावे लागले.