नाशिक – सोशल मिडियात अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. मात्र, एका व्हिडिओमुळे छोटा राजन टोळीतील साथीदार नाशिक पोलिसांच्या ताब्यात आला आहे. दिवसाढवळ्या नगरसेवकावर गोळ्या झाडून त्याची हत्या केल्याप्रकरणी हा संशयित पोलिसांना हवा होता. त्याला नाशिक पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे.
नाशिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ने ही कारवाई केली आहे. छोटा राजन टोळीतील साथीदार असलेला जयराम नामदेव लोंढे हा देवळाली गावातील रहिवासी आहे. दिव-दमण या केंद्रशासित प्रदेशातील नगरसेवक सलीम अन्वर बारबटीया उर्फ सलीम मेमन यांची आठ महिन्यांपूर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. समुद्रकिनारचा भुखंड रिकामा करण्याच्या प्रकरणात ही हत्या करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी छोटा राजन टोळीला सुपारी देण्यात आली होती. कारमधून आलेल्या पाच संशयितांनी मेमन यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले होते.
याप्रकरणी दमण पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुजरात पोलिस कसून शोध घेत होते. पोलिसांच्या आंतरराज्य माहिती आदान-प्रदान उपक्रमांतर्गत या घटनेची व्हिडीओ क्लिप गुजरात पोलिसांनी नाशिक पोलीसांना दिली. शहरातील गुन्हेगारांची इत्थंभूत माहिती असलेल्या युनिट २ चे सहाय्यक उपनिरीक्षक शामराव भोसले यांना या व्हिडिओतील गुन्हेगाराची ओळख पटली. देवळाली गावातील संशयित असल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक दिनेश बर्डेकर यांना दिली. त्यानंतर दसऱ्याच्या दिवशी नाशिक पोलिसांच्या पथकाने संशयिताच्या घरावर छापा टाकला. त्यात तो घरातच सापडला.
दमण येथे हत्या केल्यानंतर लोंढे हा देवळाली गावातील एका ट्रकचालकाच्या माध्यमातून चेन्नईला गेला होता. दसरा सणासाठी तो घरी येताच पोलिसांनी त्याला जेरबंद केले. संशयित लोंढेने गुह्याची कबुली दिली असून त्यास दमण पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. ही कारवाई आयुक्त दीपक पाण्डेय, उपायुक्त संग्रामसिंग निशानदार,सहाय्यक आयुक्त समीर शेख,वरिष्ठ निरीक्षक दिनेश बर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक वसंत खतेले, जमादार श्यामराव भोसले, हवालदार देवकिसन गायकर, शंकर काळे, राजेंद्र घुमरे, राजाराम वाघ, अन्सार सय्यद, पोलीस नाईक संजय ताजणे, शिपाई जयंत शिंदे, संतोष माळोदे आदींच्या पथकाने केली.
बघा सीसीटीव्ही फुटेज