न्यूयॉर्क – ज्याचा पाठीराखा परमेश्वर असतो, तो सगळ्या संकटातून सहिसलामत सुटतो, असं म्हटलं जातं. नेमका हाच अनुभव जॉय अँड्र्यू या महिलेला आला आहे. वयाच्या ९९ व्या वर्षी, यंदाच्या मे महिन्यात या महिलेला कोरोना झाला. डॉक्टरांनी तर सगळ्याच आशा सोडल्या होत्या. आणि कुटुंबाला देखील संपूर्ण कल्पना देऊन जे काही घडेल त्याला तयार राहण्यास सांगितले होते. पण या ९९ वर्षांच्या आजीने या आजारावर यशस्वीरीत्या मात करत चक्क १०० व्या वर्षात पदार्पण केले आहे.
परिस्थितीशी जिद्दीने दोन हात करणे हे बहुधा जॉयच्या रक्तातच आहे. अगदी पहिल्यापासून ती काही ना काही संकटातून सहीसलामत बचावली आहे. सुरुवातीला नाझींच्या छळछावणीतू न ती वाचली. त्यानंतर ती ज्या विमानातून प्रवास करत होती, त्या विमानाचा अपघात झाला. त्यानंतर तिला कॅन्सर झाला. त्यातूनही ती रिकव्हर झाली. आणि आता शेवटी कोरोनाने तिला गाठले. पण जॉयने त्यावरही मात केली. २२ तारखेला तिने वयाची शंभरी गाठली. तिला राणीकडून एक शुभेच्छापत्रही मिळाले आहे.
जॉयची मुलगी ५७ वर्षीय मिशेल अँड्र्यू म्हणते की, मला माझ्या आईचा फार अभिमान वाटतो. ती तिचं आयुष्य फार आनंदात आणि अनेक संकटांना तोंड देत जगली आहे. आतासुद्धा कोरोनावरील ही मात तिच्या साकारात्मकतेचं आणि जिद्दीचं दर्शन घडवते.
१९२० मध्ये जॉय हिचा उत्तर लंडनमध्ये जन्म झाला. मोठी झाल्यावर तिने हवाई दलातील नोकरी स्वीकारली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात तिने महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. त्यानंतर तिला जर्मनीतील डसेलडॉर्फ येथे पाठवण्यात आले. पण ती ज्यू असल्याने तिला मारण्याचे प्रयत्न झाले. त्यातून ती बचावली.
युद्ध संपल्यानंतर जॉयने ब्रिटिश ओव्हरसीज एअरवेजमध्ये एअरहोस्टेस म्हणून काम केले. ती फ्लाईटमध्ये असताना ते विमान लिबियामध्ये कोसळले. या अपघातातूनही ती सुखरूप राहिली. त्यानंतर ब्रेस्ट कॅन्सर आणि आता कोरोना.
तिची मुलगी म्हणते, मार्चपासून मी आईला भेटलेले नाही. त्यापूर्वी मी तिला आठवड्यातून तीन वेळा तरी भेटायला जात असे. मला तिची काहीच काळजी नाही, असा समाज ती करून घेईल अशी भीती मला वाटते. लवकरच मी तिला भेटणार असून तिचा वाढदिवसही साजरा करणार आहे.