नाशिक – राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तसेच जिल्ह्याचे पालक मंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी चाचणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तशी माहिती खुद्द भुजबळ यांनीच दिली आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून भुजबळ हे शेकडो व्यक्तींच्या संपर्कात होते. त्यामुळे या सर्वांना आता कोरोना चाचणी करुन घेणे आवश्यक आहे.
भुजबळ यांनी काल म्हणजेच रविवारी जिल्ह्याची कोरोना आढावा बैठक, साहित्य संमेलनाचे नियोजन यासह विविध प्रकारच्या बैठका घेतल्या. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार सरोज अहिरे यांच्या विवाह सोहळ्यालाही भुजबळ यांनी हजेरी लावली. याच सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक मंत्री व मान्यवर उपस्थित होते. हे सर्व जण भुजबळ यांच्या संपर्कात आल्याने आता त्यांनाही योग्य ती खबरदारी घ्यावी लागणार आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून लॉकडाऊन जाहिर करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सात दिवसांचा अवधी दिला आहे. तसेच, महाविकस आघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. सध्या आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे, राज्यमंत्री बच्चू कडू हे सुद्धा बाधित आहेत.
माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या दोन तीन दिवसात माझ्या संपर्कात अलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी.माझी प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी.मास्क,सॅनिटायझर चा नियमित वापर करा.#COVID19
— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) February 22, 2021